Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
इंद्रायणी तीरी एकवटला वैष्णवांचा मेळा
5पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : भक्तिरसात चिंब झालेली अलंकापुरी... इंद्रायणी तीरी एकवटलेला वैष्णवांचा मेळा... टाळ-मृदुंगांचा गजर... भगव्या पताका... ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले अन् सावळ्या विठूच्या भेटीच्या ओढीने आषाढी वारीला दिमाखात सुरुवात झाली. पालखी मार्गावर रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो विठ्ठलभक्तांनी माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. या सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटे घंटानाद, काकडा, अभिषेक, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास दर्शनबारी बंद ठेवली होती. माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालून अकरा ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष करण्यात आला. दुपारी अडीचच्या सुमारास रथापुढे व रथामागे असणार्‍या मानाच्या प्रमुख 47 दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे सरकत होत्या. वारकरी टाळ-मृदुंगांच्या गजरात दंग होऊन नाचत-गात होते. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.      
महिलांबरोबर पुरुषांनीही फुगडीचा फेर धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात तरुण वारकर्‍यांचा सहभाग लक्षणीय होता.
सर्वांच्या मुखातून ‘ज्ञानोबा तुकाराम... माउली माउली... ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा गजर सुरू होता. प्रस्थान सोहळा साडेतीन तास रंगला. सोहळ्याची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सोहळा सुरू असताना दिंड्यांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. पाच वाजता माउलींचे मानाचे दोन अश्‍व मंदिरात आणण्यात आले. अश्‍वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्‍व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंड्या बाहेर सोडण्यास सुरुवात झाली. पालखी मंदिरातून बाहेर निघताच वारकरी, भक्तांनी जल्लोष सुरू केला. पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकर्‍यांची झुंबड उडाली होती. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. आजोळ घरी समाजआरती, जागर व भाविकांना दर्शन असा कार्यक्रम होणार आहे.
तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत
ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत शुक्रवारी उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला होता.  पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत असून उद्या, दि. 7 रोजी पालखी पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे.
देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर अनगडशहाबाबा दर्गा येथे पहिली अभंगारती झाली. चिंचोली पादुका येथे दुसरी अभंगारती झाली. माळवाडी, झेंडे मळा, देहू रोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि देहूकरांचा निरोप घेऊन पालखी पुणे-मुंबई महामार्गाने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. तेथे महापालिकेच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारकर्‍यांची रांग, टाळ-मृदुंगांचा गजर आणि रिमझिम पावसात आनंदाला आलेली भरती, असे मनमोहक दृश्य शहरवासीयांना अनुभवयला मिळाले. स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावली. शनिवारी पहाटे पाच वाजता ती पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आणि वारकर्‍यांना राहण्यासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: