Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अतीत, उंब्रज येथील पाच खाजगी सावकारांवर गुन्हा
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : तमाशा मंडळ उभारण्यासाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाखांच्या वसुलीसाठी धमकावणार्‍या अतीत, उंब्रज येथील पाच खासगी सावकारांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय नानासाहेब सोनावणे (रा. अतीत, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी, दत्तात्रय सोनावणे यांनी कलारजनी माया उंब्रजकर लोकनाट्य तमाशा मंडळाची निर्मिती करण्यासाठी अतीत येथील मज्जीद मुल्ला याच्याकडून दि. 19 मे 2011 ते दि. 24 एप्रिल 2017 या कालावधीत 16 लाख 65 हजार रुपये दरमहा 5 टक्के व्याजाने घेतले होते. व्यवसायातून येणार्‍या रकमेतून सोनावणे यांनी मुल्ला याला वेळोवेळी 37 लाख 25 हजार रुपये परत दिले होते. त्यानंतरच्या काळात पैशाची गरज भासल्याने सोनावणे यांनी गावातीलच चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून दि. 20 जून 2016 रोजी 2 लाख रुपये दरमहा 5 टक्के व्याजाने घेतले. या रकमेपोटी सोनावणे यांनी चव्हाण याला 1 लाख 5 हजार रुपये परत केले. सोनावणे यांनी दि. 30 जानेवारी 2014 ते दि. 3 ऑगस्ट 2015 या काळात हणमंत रघुनाथ कारंडे याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये दरमहा 4 टक्के व्याजाने घेतले. त्यापोटी त्यांनी कारंडेला 2 लाख 50 हजार रुपये परत दिले. व्याजाने पैसे घेत असताना सोनावणे यांनी पत्नीच्या मामाची 19 गुंठे जागा कारंडे याला 3 वर्षाच्या आत सोडवून घेण्याच्या अटीवर खूशखरेदी दिली होती. 
हे कर्ज फेडण्यासाठी सोनावणे यांनी मुन्ना पटेल (रा. उंब्रज, ता. कराड) याच्या मध्यस्थीने स्वत:चा टेम्पो 3 लाख 50 हजारांना विकला. टेम्पो विकल्यानंतर पटेलने सोनावणे यांना 2 लाख 45 हजार रुपयेच परत दिले तर उर्वरित 1 लाख 5 हजार स्वत:कडे ठेवून घेतले. हे पैसे मागूनही पटेलने ते सोनावणे यांना परत केले नाहीत. त्यानंतर 2011 ते मे 2018 या काळात उंब्रज येथील सुभाष व्यंकट जावळे याच्याकडून दर महिना 5 टक्के व्याजाने 80 हजार रुपये घेतले. त्यापोटी सोनावणे यांनी 2 लाख 75 हजार रुपये परत केले. व्याजाने घेतलेल्या 21 लाख रुपयांच्या बदल्यात 45 लाखांची परतफेड करुनही मज्जीद मुल्ला, चव्हाण, हणमंत कारंडे (तिघे रा. अतीत) आणि मुन्ना पटेल, सुभाष जावळे (रा. उंब्रज) हे सोनावणे यांना व्याजाची फेड करण्यासाठी वारंवार धमकावत होते. दि. 5 जुलै रोजी सायंकाळी या पाच जणांनी सोनावणे यांना अडवून व्याजाचे पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि चारचाकी गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सोनावणे यांनी गुरुवारी रात्री तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक दुधाणे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: