Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्तव्यात कसूर करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: lo1
पोलीस अधीक्षकांची कारवाई
5सातारा, दि. 6 : कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहणे, अशा तक्रारी असलेले कराड तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार एस. पी. मोरे आणि भुईंज पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अरुण प्रल्हाद नाळे यांना निलंबित करून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी, कराड तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार एस. पी. मोरे यांच्याकडील तपासाची 20 प्रकरणे प्रलंबित असून ते 2 एप्रिलपासून वरिष्ठांच्या परवानगीविना गैरहजर आहेत. या गैरहजेरीबाबत वरिष्ठांना कोणताही माहिती कळवली नाही अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र दिले नाही. ते सातारा येथे रहात असल्याने हजर होण्याबाबत नोटीस पाठवली असता त्यांनी ती स्वीकारली नाही अथवा त्याबाबत खुलासाही केला नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय तळबीड पोलीस ठाणे   असणार आहे. त्याचप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अरुण प्रल्हाद नाळे हे कर्तव्यात टाळाटाळ करतात, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करत नाहीत, अशा तक्रारी होत्या. दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातील चिंचेच्या झाडाचा लिलाव करुन त्यापोटी भुईंज येथील गोपाळ वस्तीतील राजेश बाळू पवार याच्याकडून एक हजार रुपये अ‍ॅडव्हान्स स्वीकारला. 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत ते परवानगीविना गैरहजर राहिले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांचे निलंबन करून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांना वाठार हे मुख्यालय पोलीस ठाणे देण्यात आले आहे. बेशिस्त कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा संदीप पाटील यांनी दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: