Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोरणा-गुरेघर धरण पूर्ण भरले
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: re4
तिन्ही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
5पाटण, दि. 6 : पाटण तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे मोरणा विभागाला वरदायिनी ठरणारे मोरणा-गुरेघर धरण गुरुवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून नदीला पूर आलेला आहे. दरम्यान, मोरणा-गुरेघर धरण भरल्याने मोरणावासीयांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटला आहे. शेतकरी चांगलाच सुखावला आहे.
पाटणसह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नद्यांना पूर आला आहे. तालुक्यातील मोरणा विभागातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने मोरणा विभागाची तहान भागविणारे मोरणा-गुरेघर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणात सध्या 0.3 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून अतिरिक्त पाणी धरणाच्या तिन्ही वक्र दरवाज्यातून ओसंडून नदीपात्रात वाहू लागले आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.
पूर्वी मोरणा नदीला पूर आल्यानंतर मोरणा नदीवरील जुना वाडीकोतावडे येथील पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे नदीपलीकडे अनेक गावांचा संपर्क तुटत होता. मात्र याच पुलालगत मोरणा नदीवर नव्याने मोठा पूल बांधण्यात आल्याने नदीपलीकडील गावे संपर्कात  आली आहेत. सोमवारी व मंगळवारी मोरणा विभागात पावसाने दमदार हजेरी लावण्याबरोबरच बुधवारी संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोरणावासीयांची चिंता आता दूर झाली आहे. शेतकरीही चांगलाच सुखावला आहे.
मोरणा परिसरात जून महिन्यात ज्वारी, भुईमूग, भात या पिकांची पेरणी करण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय या चिंतेत शेतकरी सापडला होता. विभागात प्रामुख्याने भात हे पीक रोप पद्धतीने घेतले जाते.
ही रोपे लावण्यासाठी तरू पेरले होते. मात्र पाऊसच नसल्याने रोप लावण्यासाठी शेतात चिखल तरी कसा करायचा, असा प्रश्‍न
शेतकर्‍यांना पडला होता. मात्र परत एकदा वरुण राजा शेतकर्‍यांवर प्रसन्न झाला आणि गायब झालेल्या पावसाने दमदार एंट्री केली. त्यामुळे मोरणा विभागात भात लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला
आहे तसेच शेतीच्या इतर कामातही शेतकरी गुंतला आहे. एकंदरीत मोरणा विभागात पडणार्‍या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा पाहण्यासाठी गर्दी होवू लागली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: