Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूर जिल्ह्यात दरीत कार कोसळून पाच ठार
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: mn1
तिलारी घाटात पर्यटकांवर काळाचा घाला
5कोल्हापूर, दि. 8 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती वॅगनार कार खोल दरीत कोसळून पाच जण जागीच ठार झाले. हे पाचही तरुण बेळगावचे असून सुट्टीनिमित्त ते तिलारी घाट परिसरात फिरायला गेले होते. अपघातात ठार झालेल्यांपैकी चार जण बेळगावमधील एका महिला सोसायटीचे कर्मचारी होते.
मोहन लक्ष्मण रेडेकर (वय 40), किसान मुकुंद गावडे (19), यल्लाप्पा एन. पाटील (45), चालक पंकज उर्फ ज्योतिर्लिंग संपत किळेकर (39) आणि नागेंद्र सिद्रय्या बाबू गावडे (29) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
तिलारी घाट सुरू होताना लष्कर पॉइंटजवळ ही दुर्घटना घडली. रविवारी सांयकाळी पाचच्या सुमारास हे युवक लष्कर पॉइंटकडे मारुती वॅगनार (केए-04-एमबी-4620) कारने जात होते. लष्कर पॉइंट येथील वळण अगदी धोकादायक असून तेथे संरक्षक लोखंडी खांब आहेत. मात्र पुढील बाजूला जागा मोकळी आहे. तेथे गवत आहे. या पॉइंटजवळ आल्यानंतर दाट धुक्यामुळे कारचालकाला रस्त्याचा नेमका अंदाज आला नाही. त्यामुळे कार रस्ता सोडून गवतावर गेली. तेथे ब्रेक न लागल्यामुळे कार घाटातील दरीत सुमारे 250 फूट खाली कोसळली. या अपघातात कारमधील पाचही जण जागीच ठार झाले. त्यातील दोघांचे मृतदेह गाडीत अडकले होते. ते काढण्यासाठी कटरने कारचा पत्रा कापून काढावा लागला. उर्वरित तिघांपैकी दोन मृतदेह कारच्या बाहेर आणि एक मृतदेह कार कोसळल्याच्या ठिकाणाहून दूर अंतरावर पडला होता, अशी माहिती चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह आणि वाहन काढण्यास सुरुवात करण्यात आली. कार खोल दरीत पडल्याने आणि पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. दरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चंदगडला नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, सुनील पाटील यांनी चंदगडला
धाव घेतली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: