Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातील युवकाची रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : सातारा येथील व्यावसायिक गुरुदत्त वर्णेकर (वय 37) यांनी जरंडेश्‍वर रेल्वेस्थानकाजवळ रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास रेल्वे मालगाडीखाली उडी टाकून आत्महत्या केली. जरंडेश्‍वर रेल्वेस्थानकाजवळ सापडलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-11-सीएल-1118) आणि या गाडीत सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी तपास केल्यावर मृताची ओळख पटवण्यात आली.
याबाबत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि स्थानिक रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुण्याहून मिरजकडे जाणारी रेल्वे मालगाडी दुपारी सव्वाचारच्या सुमारास  जरंडेश्‍वर स्थानकाजवळ आल्यावर तेथे एका युवकाने उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यानंतर रेल्वे
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा चेंदामेंदा झाल्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. रेल्वे पोलिसांनी ओळख पटवण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता जरंडेश्‍वर रेल्वेस्थानकजवळ आढळलेल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीच्या
कागदपत्रावर विमल गुरुदत्त वर्णेकर असे नाव होते. या नावावरुन पोलिसांनी तपास केला असता आत्महत्या केलेल्या गुरुदत्त यांची ओळख पटवण्यात आली. पंचनाम्यानंतर पोलिसांनी वर्णेकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. तेथे गुरुदत्त वर्णेकर यांचे नातेवाईक व मित्रमंडळींची गर्दी झाली होती. गुरुदत्त यांच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदत्त हे दुपारी दुकान बंद करून गेल्यानंतर परत आलेच नाहीत. वर्णेकर यांनी राधिका चौकात अमूल उत्पादनांचे दुकान काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. त्यांचे पूर्वीपासून वर्णेकर अँन्ड सन्स हे झेरॉक्स, जनरल स्टोअर्सही होते. आजही ते दुकानात दुपारपर्यंत काम करत होते. त्यांच्या आत्महत्येमुळे नातेवाइक व मित्रमंडळींना धक्का बसला. या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: