Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणात 35 हजार 88 क्युसेक्स पाण्याची आवक
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:41 AM (IST)
Tags: re4
5पाटण, दि. 8 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असून शिवसागर जलाशयात येणार्‍या पाण्याची आवक रविवारी चांगलीच वाढली. जलाशयात 35 हजार 88 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. तीन टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात 42.88 टीएमसी पाणीसाठा झाला असून 40 टक्के धरण भरले आहे. दरम्यान, गतवर्षी याच तारखेला कोयना धरणात 37.18 टीएमसी इतका पाणीसाठा होता.
पाटण तालुक्याच्या पाटण, मोरणा, मणदुरे, ढेबेवाडी, तारळेसह इतर विभागांमध्ये पावसाची अधून मधून उघडीप होत असली तरी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्रीच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात दोन-दोन, तीन-तीन टीएमसीने वाढ होत आहे.
रविवार, दि. 8 रोजी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 80 (1660), नवजा 60 (1526), महाबळेश्‍वर 58 (1363) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील जलपातळी 2098.8 फूट, 639.674 मीटर व 42.88 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. तर जलाशयात 35 हजार 88 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी 37.18 टीएमसी पाणीसाठा होता. तो आजच्या  तारखेला 5.7 टीएमसीने ज्यादा आहे. जलाशयातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. येत्या काही दिवसात पावसाने अशीच साथ केली तर कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल. सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने लहान-मोठे धबधबे ओसांडून वाहू लागले आहेत. वातावरणातही प्रचंडगारवा निर्माण झाल्याने विभागातील गावे गारठू लागली आहेत. तर कोयना परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे.
मरळी प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत कोसळली
पाटण तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गतवर्षी लाखो रुपये खर्चून करून बांधण्यात आलेली मरळी प्राथमिक आरोग्य केंद्राची वॉॅल कंपाऊंड अचानक कोसळली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र झाले आहे.
पाटण तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मरळी प्राथमिक आरोग्य केंद्राची वॉल कंपाऊंडसाठी बांधण्यात आलेली भिंत शनिवारी अचानक कोसळली. या भिंतीचे बांधकाम गतवर्षीच पूर्ण केले होते. या भिंतीसाठी सुमारे 18 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या डीपीसीमधून मंजूर करण्यात आला होता. हे काम 31 ऑगस्ट 2017 रोजी पूर्ण झाल्याने या कामाला अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: