Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘हिटमॅन’चे शतक; इंग्लंडचा धुव्वा
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: sp1
5ब्रिस्टल, दि. 8 (वृत्तसंस्था) : सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला. रोहितने अवघ्या 56 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांची बरसात करत शतक ठोकले. त्यामुळे इंग्लंडने दिलेले 199 धावांचे आव्हान भारताने 6 चेंडू राखून लीलया पार केले. ंभारताने ट्वेंटी-20 मालिका जिंकून इंग्लंडच्या प्रदीर्घ व खडतर दौर्‍याची झकास सुरुवात केली आहे. आता या दोन देशांमधील एकदिवसीय मालिका गुरुवारपासून सुरू होणार आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. जेसन रॉय व जोस बटलर यांनी 8 षटकांतच 94 धावांची सलामी दिल्याने इंग्लंड सहज सव्वादोनशेची मजल मारणार असे वाटत होते. मात्र, हार्दिक पांड्या (4 बळी) आणि सिद्धार्थ कौल (2 बळी) यांनी इंग्लंडला 198 धावांवर रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य सहज पार केले. रोहितने 56 चेेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने 11 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार खेचले. इंग्लंडचे सर्व गोलंदाज त्याच्यासमोर निष्प्रभ ठरले. सलामीवीर शिखर धवन लवकर माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासोबत भागीदार्‍या रचत संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिक पांड्यानेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून  देण्यात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने 29 चेंडूत दोन चौकार व दोन षटकारांसह 43 तर पांड्याने 14 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या. एकाच ट्वेंटी-20 सामन्यात 30 धावा आणि 4 बळी अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन यांनी 1-1 बळी घेतला. तत्पूर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच उलटला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत 198 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण केले. रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत 31 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार अयॉन मॉर्गन लवकर माघारी परतला. भारतीय गोलंदाजांनीही बर्‍यापैकी धावा रोखल्या. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा देणार्‍या पांड्याने नंतर चार बळी घेत उर्वरित तीन षटकांत फक्त 16 धावा दिल्या. दीपक चहरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मध्ये पदार्पणातच पहिला बळी मिळवला. जॉनी बेअरस्टोने 25 तर अ‍ॅलेक्स हेल्सने 30 धावा करून इंग्लंडला 9 बाद 198 धावांचा टप्पा गाठून दिला.
धोनीचा विक्रम
भारताचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 50 झेल टिपण्याचा पराक्रम धोनीने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेत धोनीने आपले झेलांचे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात धोनीने पाच झेल घेतले. टी-20 सामन्यात सर्वाधिक पाच झेल घेण्याचा विक्रमही धोनीनेच केला आहे. धोनीचे ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये आता 54 झेल झाले असून त्याच्यानंतर दुसर्‍या स्थानावर वेस्ट इंडीजचा दिनेश रामदीन (34 झेल) आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकच्या नावावर 30 झेल आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: