Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खाजगी सावकाराने युवकाला दिले सिगरेटचे चटके
ऐक्य समूह
Tuesday, July 10, 2018 AT 11:41 AM (IST)
Tags: re1
फलटणमध्ये बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा
5फलटण, दि. 9 : व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी नितीन रमेश चांडक (वय 32, रा. मारवाड पेठ, फलटण) या युवकाचे अपहरण करून सिगारेटचे चटके देत बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी (दि. 8) फलटण येथे घडला. या प्रकरणी सोमवारी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवराज किसन पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) व त्यांच्या तीन साथीदारांनी हे कृत्य केल्याचे चांडक यांचे म्हणणे आहे. नितीन चांडक हे फटाका विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी पवार याच्याकडून फटाका स्टॉलसाठी 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी त्यांनी 1 लाख 37 हजार रुपये परत केले तरी मुद्दल बाकी असल्याचे सांगत पवार त्यांना त्रास देत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चांडक हे बारसकर चौकात थांबले होते. त्यावेळी पवार साथीदारांसह चारचाकी गाडीतून तेथे आला. त्याने चांडक यांना बोलावून घेत, मुद्दल अजून दिले नाहीस, असे म्हणून गाडीत बसायला लावले. चांडक यांनी नकार दिल्यावर गाडीतील चौघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढले. त्यानंतर गाडी मिरगाव फाटा आणि मुधोजी कॉलेजच्या मागील बाजून नेण्यात आली. तेथे चौघांनी चांडक यांना दगड, रॉड, काचेच्या बाटल्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर सिगारेटचे चटकेही दिले. यात गंभीर जखमी झालेल्या चांडक यांना नातेवाइकांनी फलटण येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सोमवारी पहाटे सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चौघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात  भादंवि कलम 326, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 363, सावकारी अधिनियम कलम 39, 45 व आर्म्स अ‍ॅक्ट कलम 3, 25 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: