Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘निर्भया’च्या मारेकर्‍यांना फाशीच
ऐक्य समूह
Tuesday, July 10, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: na1
सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : फिजिओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय ‘निर्भया’वर राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणार्‍या चार नराधमांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या नराधमांपैकी तिघांनी केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. भानुमती व न्या. अशोक भूषण यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने 4 मे रोजी पवन गुप्ता (वय 22), विनय शर्मा (वय 23) आणि मुकेश सिंह (वय 29) या तीन आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. चौथा आरोपी अक्षयकुमार सिंग (वय 31) याने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती. आजच्या सुनावणीला ‘निर्भया’चे कुटुंबीयही न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात पुनर्विचार करण्यासारखी कोणतीच पार्श्‍वभूमी नाही. त्यामुळे त्यावर पुनर्विचार करता येणार नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने तिघांची याचिका फेटाळून लावली.
दोषींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. या खटल्यातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. 13 सप्टेंबर 2013 या खटल्यातील चार आरोपींना कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश योगेश खन्ना यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 13 मार्च 2014 रोजी कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. गेल्या वर्षी 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानेही या चार नराधमांच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला होता. त्याविरोधात तीन आरोपींनी पुनर्विचार  याचिका दाखल केली होती.  दरम्यान, या नराधमांची फाशी कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले असले तरी या प्रकरणी न्याय मिळण्यात विलंब होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. पुनर्विचार याचिका फेटाळली जाणार, असा आम्हाला विश्‍वास होता. मात्र, यापुढे काय? आमचा लढा अजूनही संपलेला नाही.
आमच्या मुलीला न्याय मिळण्यात विलंब होत असून अशा प्रकारची कृत्ये करणार्‍यांना कोणतीही भीती उरलेली नाही. या कालावधीत महिलांना असलेला धोका कैकपटीने वाढला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: