Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मदन भोसले आणि संचालकांच्या चमकोगिरीमुळे किसनवीर अडचणीत
ऐक्य समूह
Tuesday, July 10, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: lo1
आ. मकरंद पाटील यांचा आरोप; मालमत्तेची विक्री करुन शेतकर्‍यांचे पैसे देण्याची मागणी
5सातारा, दि. 9 : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले आणि त्यांच्या  संचालकांच्या चमकोगिरीमुळे किसन वीर कारखाना आर्थिक अडचणीत आला असून शेतकरीही अडचणीत आहे. साखर आयुक्तांच्या आदेशानुसार  जिल्हाधिकार्‍यांनी  कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करून त्यातून येणारे पैसे प्राधान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना द्यावेत, अशी मागणी आ. मकरंद पाटील व शेतकरी सभासदांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. दरम्यान, किसनवीर आणि खंडाळा या दोन्ही कारखान्यांकडे शेतकर्‍यांचे तब्बल 98 कोटी 75 लाख 70 हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम तातडीने देवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
किसनवीर कारखान्याच्या सभासदांनी सोमवारी आ. मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी सभासदांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आ. पाटील पुढे म्हणाले, किसनवीर कारखान्यावर ही वेळ आली आहे  त्याला  गेली दहा-पंधरा वर्षे सुरू असलेली जी चमकोगिरी कारणीभूत आहे.  
ही गोष्ट आता सभासदांच्या  लक्षात येईल. यापूर्वी आम्ही अनेकदा त्यांची चमकोगिरी सभासदांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांनी शेतकर्‍यांपुढे कारखान्याची अभासी प्रतिमा निर्माण केली होती. या व्यवस्थापनाकडून सभासदांच्या हिताचे कोणतेच धोरण राबवले नाही. उलट नक्षत्रवन, बांबूवन, बाभुळवने असेच उपक्रम ते करत राहिले. मुळात कारखान्याचे उद्दिष्ट सभासदांचा ऊस गाळप करणे आणि त्यांना चांगला दर देणे हे असणे गरजेचे आहे. पण हे चुकीचे व्यवस्थापन असल्याने कारखाना अडचणीत आला आहे.
 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक पाऊल पुढे जाऊन किसनवीर कारखान्याला मदत का केली नाही या प्रश्‍नावर आ. मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा बँकेला याबाबत मर्यादा असून राष्ट्रवादीकडे ही बँक असल्याने किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने या बँकेकडे कोणतेही व्यवहार ठेवलेले नाहीत. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या कारखान्यानेही जिल्हा बँकेशी व्यवहार ठेवलेले आहेत. तसेच कृष्णा कारखानाही या बँकेला अटॅच आहे. जिल्हा बँकेत कोणतेही राजकारण केले जात नाही.
जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून शेतकर्‍यांचे गार्‍हाणे त्यांच्यासमोर मांडले आहे. मला खात्री आहे, की शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांकडून न्याय मिळेल. शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. शेतकर्‍यांच्या हितापेक्षा अधिक कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्‍नी कठोर पावले उचलावीत, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: