Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विठूनामाच्या बळावर दिवे घाट लीलया पार
ऐक्य समूह
Tuesday, July 10, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: mn1
माउलींचा सोहळा सासवडनगरीत विसावला
5पुणे, दि. 9 (प्रतिनिधी): दिंड्यादिंड्यांमधून होणारा विठूनामाचा घोष...अन् टाळ-मृदुंगांचा झंकार...अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने विठूनामाच्या बळावर दिवे घाटाचा अवघड टप्पा सोमवारी लीलया पार केला आणि सोमवारी सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच पुणेकरांनी पालखी सोहळ्यांना निरोप दिला. हडपसर येथे दोन्ही पालख्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा व तुकोबांच्या पादुकांवर माथा टेकवत भाविकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला.
माउलींचा पालखी सोहळा टाळ-मृदुंगांच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि पावसाच्या साथसंगतीत दिवे घाटाच्या दिशेने निघाला. वडकी येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. तेथे ग्रामस्थांतर्फे पालखीचे भक्तिभावात स्वागत झाले. त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. हिरवा शालू ल्यालेला अन् पावसाने चिंब झालेला दिवे घाट जणू माउलींच्या स्वागतासाठीच उभा ठाकलेला. तो पाहताच वारकर्‍यांच्या अंगात बळ संचारले. दुपारच्या सुमारास वैष्णवांच्या महामेळ्याने घाटात प्रवेश केला. माउलींची पालखी थाटात दिवे घाटातून मार्गक्रमण करू लागली तसा विठूनामाचा गजर टिपेला पोहोचला. रथ दौडू लागला. पालखीसवे वारकरीही धावू लागले.     
 वरुणराजानेही या सुरात सूर मिसळले. अवघा दिवे घाट
विठूनामात दंग झाला. दिवे घाटाच्या परिसस्पर्शाने आत्मिक बळ मिळालेल्या वारकर्‍यांनी घाटाची ही अवघड चढण सहजगत्या पार केली. पाच-साडेपाचच्या सुमारास पालखी घाटमाथ्यावर पोहोचली. सायंकाळच्या सुमारास माउलींची पालखी संत सोपान महाराजांच्या सासवडनगरीत विसावली.
सासवडकरांनी पुष्पवृष्टी करून आणि स्वागत कमानी उभ्या
करून दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आलेल्या पालखीचे
‘माउलीऽऽ माउलीऽऽ’च्या गजरात भक्तिभावात स्वागत केले.
सोपाननगर येथे भव्य व सुशोभित पालखी तळावर रात्री 9 वाजता पालखीचे आगमन झाल्यावर समाजआरती झाली. त्यानंतर दमलेले
वैष्णव एकादशीच्या फराळासाठी आणि विश्रांतीसाठी आपल्या राहुट्या-तंबूत विसावले.
तत्पूर्वी, सासवड येथील चंदन टेकडी येथे नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा सासवडकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकर्‍यांसाठी अनेक संस्थांनी
फराळाचे जिन्नस वाटले. पालखी तळावर जलसंपदा राज्यमंत्री
विजय शिवतारे, पुरंदरचे प्रांताधिकारी संजय आसवले, भोरचे
पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व मान्यवर समाजआरतीला उपस्थित होते.
यंदा सर्वदूर पाऊस वेळेवर झाल्याने मशागती आणि पेरण्या
उरकलेला वारकरी वर्ग आषाढी वारीत सहभागी झाल्याने विक्रमी
गर्दी आहे. पालखीच्या आगमनाने अवघी सोपानभूमी टाळ
आणि मृदुंगांच्या गजरात न्हाऊन निघाली आहे. दरम्यान, आषाढी वारीतील दोन संत बंधूंची भेट या मुक्कामात होत असून मंगळवारी दुपारी 12.30 वाजता संत सोपानकाकांची पालखी देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार आहे.
तुकोबांची पालखी ‘लोणी’त
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमार्गे लोणी काळभोर मुक्कामी दाखल झाली. लोणीत ग्रामस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी
नीरा : दरम्यान, माउलींच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. सातारा येथील बॉम्बशोधक व नाशक पथकाने रविवारी पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नीरा येथे नीरा नदीवरील पूल आणि संपूर्ण नीरा ते लोणंद पालखी मार्गाची श्‍वानपथकासमवेत तपासणी केली. यावेळी संशयास्पद काही
आढळले नाही. अशाच पद्धतीने तरडगाव, फलटण, बरड या संपूर्ण पालखी मार्गावर हे पथक तपासणी करणार असल्याचे
सांगण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: