Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हसवड येथे वाळू वाहतूक करणार्‍या दोन ट्रकवर कारवाई
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
5पळशी, दि. 10 : म्हसवड येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने मंगळवारी पहाटे दोन वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई केली. गेल्या पाच दिवसांपूर्वी तीन ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आल्यामुळे या कारवाईचे जनतेमधून स्वागत करण्यात येत आहे .
माणगंगा नदीपात्रातून म्हसवड हद्दीत वाळू तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. माण तालुक्यात अन्य ठिकाणीही वाळू तस्करी चांगलीच बोकाळली आहे. यावर पायबंद घालण्यासाठी गेल्या महिन्यापूर्वी  माण-खटाव या दोन तालुक्यांसाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी एक भरारी पथक तयार केले. या पथकाद्वारे  मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्यामुळे वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या पथकाने गेल्या पाच दिवसांपूर्वी पिंगळी, गोंदवले व पळशी येथील तीन ट्रॅक्टरवर एका रात्रीत तद्नंतर दोन ट्रक चोरटी वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने म्हसवड येथे वीरकरवाडी चौकात सापळा लावून सांगलीकडे वाळू घेऊन जाणारे आयशर कंपनीचे दोन ट्रक वाळू सहित ताब्यात घेतले. या कारवाईत तलाठी गणेश बोबडे, संतोष ढोले, तुषार पोळ, वडूज तहसीलचे लिपिक दादासाहेब शिंदे, शिवराज पाटील, महेश शिंदे हे कर्मचारी सहभागी झाले होते.
स्थानिक कर्मचारी गप्प का?
म्हसवड परिसरात माणगंगा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू तस्करी सुरू आहे. भरारी पथकाने एक महिन्यात जवळपास म्हसवडमध्ये पंधरा वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र येथील स्थानिक तलाठी व मंडलाधिकारी का कारवाई करत नाहीत ? ते वाळूमाफियांशी लागेबांधे असल्याने गप्प आहेत का? भरारी पथक कारवाई करते. मग स्थानिक कर्मचार्‍यांना कसे माहीत नाही, असे सवाल जनतेमधून उपस्थित केले जात आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: