Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दूध, दूध भुकटीच्या निर्यातीला अनुदान देणार
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn2
पोषण आहारातही दुधाचा समावेश : जानकर
5नागपूर, दि. 10 (प्रतिनिधी) : राज्यात दुधाचे दर कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी दुधाच्या निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये तर दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत  सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या आश्‍वासनानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते व दूध संघांशी संबंधित आमदार उपस्थित होते. या बैठकीत पुढील दोन महिन्यांसाठी दूध व दुध भुकटीच्या निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे दूध उत्पादक दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुधाची निर्यात करण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे.शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण या विभागांमार्फत राबवण्यात येणार्‍या पोषण आहार योजनेत दूध व दुधाच्या भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तूप व लोण्यावरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: