Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आत्महत्या प्रकरणातील संशयिताला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील आरोपी अभिनव विश्‍वास मस्के (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) याच्या शोधासाठी सातारा शहर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळेच युवतीने आत्महत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांपुढे तातडीने कारवाई करण्याचे आव्हान आहे.
मृत किरण दशरथ सपकाळ (वय 24)  हिचे वडील दशरथ वामन सपकाळ (सध्या रा. कृष्णानगर, सातारा, मूळ रा. आंबारवाडी, ता. खंडाळा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, किरणने  सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. परळी वैजनाथ, जि. बीड येथील अभिनव मस्के हा युवक गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी संपर्क साधत होता. सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास किरणचे वडील तिच्या लहान भावाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते तर आई घरात होती. यावेळी किरणसाठी शेजार्‍यांच्या मोबाईलवर फोन आला होता. या फोनवर ती कोणाशी तरी बोलली. या घटनेनंतर मात्र तिने आईला मोबाईलला रिचार्ज आणण्यासाठी घराबाहेर पाठवले.      
आई बाहेर गेल्यानंतर किरणने घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. किरणच्या लग्नासाठी आई-वडिलांनी पुणे येथील मॅरेज ब्युरो या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणी केली होती. दरम्यानच्या काळात अभिनव मस्के या युवकाचे स्थळ आले होते. परंतु ते आई-वडील व नातेवाईकांना पसंत नव्हते तर किरणनेही या स्थळाला नकार दर्शवला होता. असे असतानाही परळी येथील मस्के या युवकाने तिला लग्न करण्यासाठी गळ घातली होती. याबाबत तो तिला वारंवार फोन करुन  दमदाटी, शिवीगाळ करत लग्नासाठी जबरदस्ती करत होता, असा आरोप सोमवारी कुटुंबीयांनी केला. या घटनेने सपकाळ कुटुंबीय घाबरुन गेले होेते. घटनेचे गांभीर्य ओळखून खबरदारी म्हणून किरणच्या वडिलांनी एप्रिल महिन्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात या युवकाच्या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहेे. अखेर अभिनव मस्के याच्या त्रासाला कंटाळूनच किरणने आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. सोमवारी अंत्यविधी झाल्यानंतर किरणच्या वडिलांनी त्यानुसार अभिनव मस्के याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: