Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईत पुन्हा पावसाचे थैमान
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: mn1
* जनजीवन विस्कळीत; रेल्वे वाहतुकीवर परिणाम * दोन हजार रेल्वे प्रवासी, मिठागारातील कामगारांची सुटका
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला झोडपणार्‍या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीही थैमान घातलेे. सकाळपासूनच कोसळत असलेल्या तुफानी पावसामुळे मुंबईची पुन्हा ‘तुंबई’ केली. मुंबईतील अनेक भागही जलमय झाले आहेत. मुंबईतील रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. रात्री पावसाने मुंबई व उपनगरांमध्ये काहीशी विश्रांती घेतली. वसई-विरार, पालघर, ठाण्यालाही जोरदार पावसाने झोडपून काढले. तेथे अनेक भाग जलयुक्त झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील माणिकपूर येथे मिठागारातील 400 कामगार व त्यांची कुटुंबे अडकली असून तेथे ‘एनडीआरएफ’ने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत 200 कामगारांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. नालासोपारा ते विरार दरम्यान एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अडकलेल्या तब्बल दोन हजार प्रवाशांचीही सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या 24 तासांत ठाणे, पालघर आणि मुंबई शहरासह उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभर कोसळणार्‍या पावसामुळे पश्‍चिम रेल्वेमार्गावरील अनेक उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या तर मुंबईतून बाहेर धावणार्‍या अनेक रेल्वेगाड्या नालासोपारा, वसई, विरार या दरम्यान अडकून पडल्या होत्या. मानखुर्द-वाशी मार्गावरील येथे पाणी साचल्याने सीएसटी ते वाशी लोकल अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत शाळा व कॉलेजेसच्या व्यवस्थापनाला मुभा दिली होती. मुंबईतही अनेक खासगी शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे तर गरज भासल्यास मुंबईत नौदल, कोस्टगार्डची मदत घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी नागपूर पावसाळी अधिवेशनात विधानसभेत दिली. मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नौदल व कोस्टगार्डनाही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत दिली. पावसामुळे विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला गरज पडल्यास मुदत-वाढ देण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
रेल्वे प्रवासी, मिठागार कामगारांची सुटका
तुफानी पावसामुळे पालघर जिल्ह्यात मिठागरांमध्ये अडकलेल्या चारशे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी दोनशे जणांची सुटका ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी केली. नालसोपारा ते विरार दरम्यान अडकलेल्या बडोदा एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेसमधील सातशे आणि केळवा रोड स्टेशनमध्ये गुजरात मेल, दुरांतो एक्स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या एक हजार प्रवाशांची ‘एनडीआरएफ’ आणि स्थानिक प्रशासनाने सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, मानखुर्द येथे रेल्वे रुळाला तडा गेला होता. तेथे रुळाचा तुकडा तुटलेल्या ठिकाणी फडके बांधून त्यावरून लोकल नेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
पावसामुळे मुंबईत झालेल्या स्थितीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना चांगलेच फटकारले. मुंबईत दरवर्षी सखल भागात पाणी साचून रेल्वे सेवा बंद पडते किंवा कोलमडते. वर्षानुवर्षे असे होत असूनही सरकार काय करते? सखल भागातील रेल्वे रुळांची उंची का वाढवली नाही, असे प्रश्‍न विचारत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज असल्याचे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र व राज्य सरकारची कानउघाडणी केली. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई बुडत असूनही सरकारे काहीच करत नाहीत आणि आम्ही दखल घेतली की, कार्यकारी व्यवस्थेच्या अधिकारांवर न्यायव्यवस्था अतिक्रमण करत असल्याची बोंब मारता, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.
पावसामुळे पुन्हा ‘तुंबापुरी’
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. रात्रभर कोसळणार्‍या पावसाने सकाळी जोरदार हजेरी लावल्याने मुंबईतील दादर हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, माटुंगा, वरळी, लालबाग, चेंबूर, शीव, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी, कांजूरमार्ग, वसई, विरार, नालासोपारा आदी भागात प्रचंड पाणी साचले. या भागांमध्ये एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली तर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अनेक उपनगरीय रेल्वेगाड्या अडकून पडल्या तर अनेक रेल्वेगाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत होत्या. मानखुर्द रेल्वेस्थानकात प्रचंड पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सीएसटी ते वाशी रेल्वे सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. ही लोकल सेवा सुरू करण्यासाठी पंप लावून पाणी उपसा केला जात होता.
रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवाही कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कल्याण-डोंबिवली, ठाणे परिसरातही पावसाचा धुमाकूळ सुरू होता. उंबरगाव ते विरार दरम्यान 12 एक्स्प्रेस गाड्या कैक तास खोळंबल्या होत्या. त्यामुळे चिमुरड्यांचे हाल झाले. या गाड्यांमधील प्रवाशांना खास रेल्वेगाडीने खाद्यपदार्थ पुरवण्यात आले. दिवसभराच्या पावसाने पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर चेक नाका येथे आणि वडाळ्यात पाणी तुंबले. दादर टर्मिनस, गांधी मार्केट, सायन-पनवेल महामार्गावरही प्रचंड पाणी साचले होते. नालासोपार्‍यात पांडेनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनीही त्यांची सेवा मंगळवारी बंद ठेवली होती.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
तुफानी पावसामुळे शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने मुंबईत अनेक खासगी शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर केल्या. ठाणे, पालघर जिल्ह्यातही शाळा, महाविद्यालयांना अधिकृत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईत गेल्या तीन दिवसांत 1363 मिमी पावसाची नोंद झाली. या तीन दिवसांत सरासरीच्या 54 टक्के पाऊस मुंबईत कोसळल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वसईत गेल्या 24 तासांत 299 मिमी तर विरारमध्ये 235 मिमी पावसाची नोंद झाली.
शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गुरुवारपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या नदी ओसंडून वाहू लागली असून नदीकिनार्‍यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
...तर नौदल, कोस्टगार्डची मदत घेणार
दरम्यान, मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नौदल व कोस्टगार्डना सज्ज ठेवण्यात आले असून गरज पडल्यास त्यांची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याकडे लक्ष वेधले. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थितीची माहिती दिली. मुंबई व कोकणात अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात प्रशासनास अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: