Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कामात सुधारणा करा, नाही तर किंमत मोजायला तयार रहा
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo1
विभागीय आयुक्तांचा इशारा : जिल्हा प्रशासनाचे, जिल्हा बँकेचे कौतुक
5सातारा, दि. 10 : आमचे प्रत्येक अधिकारी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, असा दावा मी कधी करणार नाही. जी परिस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे, त्यास अनुसरुन अधिकार्‍यांनी काम करणे अभिप्रेत आहे. जे चांगले काम करतील त्यांचे कौतुक केले जाईल आणि जे कामात सुधारणा करुन चांगले काम करणार नाहीत त्यांनी त्याची किंमत मोजायला तयार रहावे, अशा शब्दात  पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अधिकार्‍यांना इशारा दिला आहे. दरम्यान, पीक कर्ज वाटपात सातारा जिल्ह्याने खूप काम केले आहे. त्याचे सर्व श्रेय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे. सातारा जिल्हा प्रशासनाचे कामकाजही खूप चांगले आहे, अशा शब्दात विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे व जिल्हा बँकेचे तोंडभरुन कौतुक केले.
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच विभागीय आयुक्त म्हैसेकर सातारा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी दिवसभरात विविध अधिकारी, कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असून विस्थापित झालेल्यांची संख्याही राज्यात सर्वाधिक आहे. मात्र, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पुनर्वसन कार्यालयात चांगली वागणूक मिळत नसल्याचे पत्रकारांनी  म्हैसेकर यांच्या निदर्शनास  आणून दिले असता त्यांनी नाराजी व्यक्त करतच याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. आम्हीही माणसे आहोत. आमच्याकडूनही चुका होवू शकतात. मात्र, त्या टाळण्यावर आमचा भर आहे आणि आम्ही त्यात शंभर टक्के  यशस्वी होण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुनर्वसनाचा विषय गंभीर आहे. त्यावर काम झालेच पाहिजे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा विषयही गंभीर आहे. अजून काही संकलन रजिस्टर व्हायचे आहे. एका गावाचे तर मिळतच नाही. वांग-मराठवाडीचा विषयही गंभीर आहे. तेथेही  पुनर्वसनाच्या अनुषंगाने काही विषय आहेत. तेही काम लवकरच मार्गी लावणार आहे. ज्यांनी आपल्य जमिनी विकास प्रकल्पांसाठी दिल्या आहेत, त्याचा सन्मान झालाच पाहिजे. त्यांना जर कोणी चांगली वागणूक देत नसेलतर तो प्रकार गंभीर आहे. जे कोणी अधिकारी असे आहेत त्यांची माहिती जर मिळाली तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल. त्यांना कोणी हिडीस फिडीस करत असेलतर त्याचीही माहिती आम्हाला देण्यात यावी. त्यातूनही जर कोणी सुधारत नसेल तर त्यांचे अवघड होईल, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
प्लास्टिक बंदी जोरात सुरु असून त्याची अंमलबजावणी पुणे विभागात सक्षमपणे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यात 25 हून अधिक गटांना कापडी आणि कागदी पिशव्यांच्या निर्मितीचे काम देण्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजनेचे काम अतिशय चांगले झाले आहे. शहरामध्ये आम्ही पंतप्रधान निवास योजनेला प्राधान्य देणार असून नागपूरच्या धर्तीवर काम करण्यात येणार आहे. नमामी चंद्रभागा योजना पूर्ण करण्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे. 552 किलोमीटरचा हा प्रवास आहे. उजनीपासून तो सुरु होणार आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयातील समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी माहिती घेवून तत्काळ निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध योजना पूर्ण करण्यावर भर देणार आहे. पुणे विभाग राज्यात उठावदारपणे कसा दिसून येईल, यावरही मी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. पुणे विभागात नव्याने अंमलात येणार्‍या योजना, नमामी चंद्रभागा, पंतप्रधान आवाज योजना, जलयुक्त शिवार आदी योजनांच्या अनुषंगाने माहिती दिली. कासच्या बेकायदेशीर बांधकामांवर ते म्हणाले, हा प्रश्‍न आताच माझ्यासमोर आला आहे. त्याची मी माहिती घेईन. जे काम कायद्याला धरुन झाले नाही त्यावर निश्‍चित कारवाई केली जाईल. झिरो पेंडन्सीचा कार्यक्रम यापुढेही सुरु राहील. त्यावर क्रॉस चेकिंग केले जाईल. अचानकपणे पंचायत समिती, ग्रामपंचायतींची तपासणी करुन योग्य प्रकारे कामकाज सुरु आहे का नाही हे तपासले जाईल. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: