Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणातील पाणीसाठ्याची अर्धशतकाकडे वाटचाल
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: re3
48 टीएमसी पाणीसाठा; 27 हजार क्युसेस आवक
5पाटण, दि. 10 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने मंगळवारपासून पुन्हा जोर धरला आहे. रात्रभर सुरू असलेल्या संततधारे-मुळे गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या जलाशयात तब्बल 3.28 टीएमसीने पाणीसाठा वाढला असून धरण 45 टक्के भरले आहे. जलाशयात पाण्याची आवकही प्रतिसेकंद 27 हजार 383 क्युसेस इतकी वाढली आहे. धरणात सध्या 48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, पाटण परिसरातही मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. अधूनमधून प्रमाण कमी होत असले तरी रात्री दमदार पाऊस होत आहे. सोमवारी कमी झालेल्या पावसाने पुन्हा आपला जोर दाखवला. मंगळवारी रात्री आणि दिवसभर संततधार होती. त्यामुळे नवजा येथील ओझर्डे धबधबाही ओथंबून वाहू लागला आहे. कोयना धरणाच्या वरील बाजूस नवजा, मानाईनगर, डिचोली परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत कोयनानगर येथे 40 (1807), नवजा 35 (1670), महाबळेश्‍वर 69 (1554) मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची पाणीपातळी 2104 फूट 11 इंच व 641.579   मीटर झाली आहे. कोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला 38.02 टीएमसी पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 10 टीएमसी ज्यादा पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रातील प्रतापगड 61 (1626), सोनाट 30 (1163), वळवण 62 (1907), बामणोली 45(1067) व काठी 19 (1141) मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात मंडलनिहाय पाटण 12 (438), तारळे 7 (162), मल्हारपेठ 6 (222), मोरगिरी 45 (696), चाफळ 2 (123), मरळी 26 (219), ढेबेवाडी 6 (286), तळमावले
5 (155), कुठरे 11 (256), म्हावशी 10 (451) मिमी पावसाची नोंद झाली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: