Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात दारुबंदीचा विचार नाही : बावनकुळे
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: mn3
5नागपूर, दि. 10 (प्रतिनिधी) राज्यात दारुबंदी करण्याचा शासनाचा विचार नाही. मात्र, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमधील दारुबंदी मागे घेतली जाणार नाही, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. दारुबंदी असूनही चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. अन्य राज्यातून, शेजारच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारू आणून ती अवैधरीत्या विकली जात आहे. कालच 1 कोटी 34 लाख रुपयांची दारू पकडल्याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. दारुबंदीचे धोरण फसल्याने या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मी दारुबंदीच्या विरोधात नाही; परंतु ही बंदी केवळ कागदावर नको. चंद्रपूर येथील बंदीचा फेरविचार करा किंवा संपूर्ण राज्यात दारुबंदी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. याला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यातील दारुबंदी मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात दारुबंदी लागू करण्याचाही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी आहे, तेथे त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि गावठी दारुला आळा घालण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा व कायद्यात कठोर तरतुदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामरक्षक दलाचे गठन प्रत्येक गावात करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ग्रामरक्षक दलाने तक्रार केल्यानंतर 24 तासांत कारवाई केली नाही तर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: