Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणातील पाणीसाठ्याने ओलांडले अर्धशतक
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re4
51 टीएमसी पाणीसाठा; 38 हजार क्युसेसने आवक
5पाटण, दि. 11 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून शिवसागर जलाशयात 38 हजार 670 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 51 टीएमसी झाला असून गेल्या 24 तासांमध्ये पाणीसाठ्यात तब्बल तीन टीएमसीने वाढ झाली आहे. तालुक्याच्या केरा भागातील दिवशी खुर्द येथे वादळी वारे व पावसामुळे माडाचे झाड उन्मळून घरावर पडल्याने 50 हजारांचे नुकसान झाले. याच गावातील एका शेतकर्‍याची गाभण म्हैस ओढ्याच्या पुरात वाहून गेली. विजेचे दोन खांब जमीनदोस्त झाल्याने गावचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान, नवजा येथे 24 तासात 100 मिमी, महाबळेश्‍वर 65 व कोयनानगर येथे 104 मिमी पावसाची नोंद झाली. 105.25 टीएमसी क्षमतेचे कोयना धरण 48 टक्के भरले असून पाणीसाठ्याने अर्धशतक गाठले आहे.
केरा भागातील दिवशी खुर्द येथील लक्ष्मण किसन कदम यांनी दोन वर्षापूर्वी बांधलेल्या सिमेंटच्या घरावर मंगळवारी रात्री जोरदार वारा व पावसामुळे माडाचे झाड उन्मळून पडले. यात कदम यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी शिर्के यांनी पंचनामा केला. जुंगटीतील शेतकरी जयराम सीताराम सुतार यांची दुगल जातीची गाभण म्हैस दिवशी खुर्द येथील धारेश्‍वर शिवारातील अस्वलधोंडी थोरला नावाच्या ओढ्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे दोन खांब वाकल्याने केबल तुटून गावचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पाटण तालुका व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार आहे. रात्री पावसाचा जोर वाढत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 58 (1911), नवजा 56 (1770) व महाबळेश्‍वर 24 (1691) मिमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीपातळी 2108 फूट 3 इंच, 642.595 मीटर झाली. कोयना धरणात 51 टीएमसी पाणीसाठा झाला असून 38 हजार 670 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. गतवर्षी याच तारखेला 38.12 टीएमसी पाणीसाठा होता. पाटण तालुक्यातील इतर भागातही दिवसभर संततधार सुरू होती. पाटण येथे बुधवारी 18 (456), मल्हार पेठ  (224), तारळे 4 (166), चाफळ 5 (128), ढेबेवाडी 51 (337), तळमावले 12 (167), मरळी 26 (245), म्हावशी 16 (460), मोरगिरी 24 (720), कुठरे 55 (311) मिमी पाऊस पडला असून काजळी, काफना, मोरणा, तारळी, केरा, वांग, उत्तरमांड या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. साखरी-चिटेघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने केरा व कोयना नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तारळी, उत्तरमांड धरणांतही पुरेसा पाणीसाठा झाला आहे. ढेबेवाडी (सणबूर) येथील महिंद धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू आहे. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने गारठा वाढला आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: