Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाणार प्रकल्पावरून विधानसभेत गदारोळ
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: mn2
शिवसेना आमदारांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : प्रस्तावित नाणार प्रकल्पावर मंगळवारी विधानपरिषदेत गप्प बसलेल्या शिवसेनेने बुधवारी विधानसभेत मात्र आक्रमक पवित्रा घेऊन कामकाज बंद पाडले. एका चर्चेला मंत्री उत्तर देत असताना मध्येच हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न शिवसेना आमदारांनी केला. अध्यक्षांनी परवानगी नाकारल्याने शिवसेनेचे राजन साळवी, प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे नितेश राणे व्यासपीठावर धावून गेले. त्यांनी अध्यक्षांच्या टेबलावरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोपदारांची व आमदारांची चांगलीच झटापटही झाली. अखेर या गोंधळातच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
नाणार प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत मंगळवारी विरोधकांनी लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई सभागृहात उपस्थित असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. उद्योगमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी  वारंवार करूनही देसाई गप्प राहिले होते आणि मुख्यमंत्र्यांनीच सरकारची बाजू मांडली होती. रिफायनरी राज्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरच होणार, असे ठणकावून सांगताना नाणारबद्दल चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे बाहेर मोठमोठ्या वल्गना करणारी शिवसेना सभागृहात मूग गिळून गप्प का, अशी टीका विरोधकांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने आज विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.
विरोधी पक्षाकडून नियम 293 अन्वये पीककर्ज व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर चर्चा उपस्थित करण्यात आली होती. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या चर्चेला उत्तर देत असताना शिवसेनेच्या सुनील प्रभू, राजन साळवी यांनी मध्येच औचित्याच्या मुद्द्याद्वारे नाणारचा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. उत्तर होऊ द्या, मग बोलू देतो, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली; पण शिवसेना आमदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा यशवंत स्टेडियमजवळ अडवण्यात आल्याने नागरिकांनी तेथे धरणे सुरू केले. त्यामुळे आताच चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह शिवसेना आमदारांनी धरला. आपण याच विषयावर स्थगन प्रस्ताव दिल्याचे निदर्शनास आणून देत तो मांडायला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परवानगी मागितली. मात्र, मंत्र्यांचे उत्तर असे मध्येच थांबवता येणार नाही, असे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ सुरू केला. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले.
त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्याने अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे शिवसेना आमदार अधिकच आक्रमक झाले. राजन साळवी, प्रताप सरनाईक आणि अन्य दोन-तीन आमदार अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. ते राजदंड पळवण्याचा प्रयत्न करत होते. तोवर काँग्रेसचे नितेश राणेही व्यासपीठावर गेले. त्यांनीही राजदंड खेचायला सुरुवात केली. एकीकडे शिवसेना आमदार, दुसरीकडे नितेश राणे आणि तिसरीकडे राजदंड सांभाळणारे अध्यक्षांचे चोपदार यांची खेचाखेच आणि झटापट सुरू झाल्याने विधानसभेचा पार कुस्तीचा आखाडा झाला. अखेर या गोंधळातच पुरवणी मागण्यांबाबतचे विनियोजन विधेयक मंजूर करून अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
....पण राजदंड सोडला नाही
सभागृह सुरू असल्याचे प्रतीक म्हणून अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवण्यात येतो. शिवसेना आमदारांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अध्यक्षांच्या तीन चोपदारांनी राजदंड घट्ट धरून ठेवला होता. राजदंड अडवण्याच्या झटापटीत अध्यक्षांचे तीन चोपदार प्रकाश शिवगण, एम. एच. कोळी व विश्‍वास धारवड हे खाली कोसळले; परंतु त्यांनी राजदंड सोडला नाही. या खेचाखेचीत राजन साळवी यांच्या पायाला थोडी इजा झाली.
शिवसेनेची स्टंटबाजी : विखे-पाटील
नाणार प्रकल्पावरून राजदंड पळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्‍वासघात करत आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. विधानसभेतील प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे-पाटील यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. विधानपरिषदेत मंगळवारी नाणारचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा शिवसेना मूग गिळून बसली होती. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे उद्योगमंत्रीही गप्प बसले होते. या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी झोडून काढल्यावर शिवसेनेला दुसर्‍या दिवशी खडबडून जाग आली आणि ‘डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना राजदंड पळवण्याची नौटंकी करावी लागली. रस्त्यावर एक अन् विधिमंडळात वेगळीच भूमिका मांडून शिवसेना कोकणवासीयांची शुद्ध फसवणूक करत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, मावा, तुडतुड्याच्या नुकसानभरपाई संदर्भात विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला मंत्री उत्तर देत असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक गोंधळ घातला. शिवसेनेला नाणारवर बोलायचे होते तर ते नंतरही बोलता आले असते; परंतु शिवसेनेला केवळ स्टंटबाजीत रस असल्याची टीका त्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: