Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सावकारी करणार्‍या जिल्ह्यातील आणखी एका टोळीला मोक्का
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11: टोळी जमवून जबरी चोरी करून, दहशत करून स्वतःचा आर्थिक फायदा करवून घेणारे तसेच खासगी सावकारी करणार्‍या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सध्या सातारा जिल्ह्यातून संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाया सुरू आहेत. त्याअंतर्गत फलटणमधील एका टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
2017 मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, आकाश खुडे या  सावकारी करून दहशत करणार्‍या 4 टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 2017 मध्ये 9 टोळ्यांवर व 2018 मध्ये रुकल्या दशरथ चव्हाण, प्रमोद ऊर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर, दत्ता रामचंद्र जाधव, दीपक नामदेव मसुगडे या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, दरोडा, खंडणीसारखे गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या तसेच खासगी सावकारी करून जबरदस्तीने वसुली करणार्‍या आणखी काही टोळ्या पोलीस अभिलेखावर आहेत व त्या खासगी सावकारी करून सामान्य लोकांना, महिलांना जोरजबरदस्ती करून, दहशत करून आर्थिक फायदा करत आहेत. या टोळ्यांच्या हालचालींवर स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पद्माकर घनवट व फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत हे लक्ष ठेवून होते.
 ऑगस्ट 2015 ते 29 एप्रिल 2018 पर्यंत महतपुरा पेठ, मलटण, ता.फलटण येथे फिर्यादीचे रहात्या घरी आरोपी सुनील माणिक जाधव   यांच्याकडून 1 लाख 40 हजार दरमहा 15 टक्के व्याजदराने घेतले असता पहिल्याच महिन्यात व्याज थकल्याने सप्टेंबर 2016 मध्ये सुनील माणिक जाधव ऊर्फ मुन्ना, त्याचा भाऊ गब्बर ऊर्फ अरुण माणिक जाधव  व त्यांच्यासोबत तीन अनोळखी असे हे फिर्यादीचे घरात घुसले व आरोपी सुनील जाधव याने फिर्यादीची 63 गुंठे जमिनीचे गहाणखत करून द्या, असे सांगितले. फिर्यादींनी नकार दिल्याने आरोपी सुनील माणिक जाधव याने परस्पर सदरची जमिनीच्या खूषखरेदीचा कागद स्वतःच्या नावावर करून घेतला व फिर्यादीचे वडिल विचारणा करण्यास गेले असता त्याने त्यांना काठीने मारहण करून शिवीगाळ केली व धमकी दिली. फिर्यादीची आई घरात एकटी असताना 11 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न असलेला टोळीप्रमुख सुनील ऊर्फ मुन्ना माणिक जाधव व त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवलेला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील करत आहेत. या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेऊन या संघटित टोळीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: