Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माउलींच्या आगमनाने जेजुरीनगरी आनंदली
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: re5
भंडार्‍याच्या उधळणीत पालखी सोहळ्याचे स्वागत
5नीरा, दि. 11 : पिवळ्या धमक भंडार्‍याची मुक्त उधळण करत जेजुरीकरांनी आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. अठरापगड जातींचं श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.
विठूनामाच्या गजराबरोबर दिंडीतील वारकरी बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चाही घोष केल्याने सारे वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी सोहळा जेजुरीजवळ आल्यावर वारकर्‍यांच्या भक्तिप्रेमाला उधाण आले. टाळ-मृदुंगांच्या तालावर माउली, संत तुकारामांचा जयजयकार करताना वारकरी संत एकनाथ महाराजांची भारुडे गाऊ लागले.
अहं वाघ्या, सोहम् वाघ्या प्रेमनगरा वारी
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी॥
असे अभंग म्हणून वारकर्‍यांनी मल्हारी वारी मागितली. 
सासवड नगरीचा दोन दिवसांचा मुक्काम आटोपून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी सकाळी जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. पुढे सासवडहून जवळील बोरावके मळ्यात सकाळची न्याहरी व यमाई शिवरीत दुपारचा विसावा आणि भोजन उरकून पालखीने सासवड ते जेजुरी हा 17 कि.मी.चा टप्पा पार केला. सोहळ्याने पाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केला. नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, मुख्याधिकारी संजय केदार, मार्तंड देवस्थानचे प्रमुख राजकुमार लोढा, विश्‍वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव, सभापती अतुल म्हस्के, नगरसेवकांनी सोहळ्याचे स्वागत केले. जेजुरीकरांनी पालखीवर भंडार्‍याची उधळण करत मोठ्या उत्साहात माउलींचे स्वागत केले. पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता कोळविहिरे रस्त्यावरील नवीन पालखी तळावर पोहोचला. तेथे समाजआरती करण्यात आली. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने वारीत वारकर्‍यांची संख्या नेहमीपेक्षा जास्तच दिसून आली.
खंडोबाच्या दर्शनाच्या ओढीने वारकर्‍यांचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या हजारो वारकर्‍यांनी रांगा लावून खंडोबाचे दर्शन घेतले. सारा गड वारकर्‍यांनी फुलून गेला. गडावर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा घोष सुरू होता. जेजुरीतील छत्री मंदिर, चिंचेची बाग, लवथळेेश्‍वर, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकर्‍यांच्या दिंड्या उतरल्या. सारी जेजुरी नगरी वारकरी बांधवांचे आदरातिथ्य व सेवा करण्यात गुंतली होती. नगरपालिकेने पालखीतळाचे सपाटीकरण व मुरमीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सेवा सहयोग संस्थेतर्फे ‘निर्मल वारी’ योजनेंतर्गत दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सातशे तात्पुरती शौचालये बसवल्याने वारकर्‍यांची चांगली सोय झाली. पुरंदर महसूल विभागातर्फे वारकर्‍यांसाठी रॉकेल, गॅस व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालिकेने सर्व भागात पुरेसा पाणीपुरवठा केला. गावातील विविध संस्था, मंडळांच्यावतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: