Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मालक व चालकाला लुटून ट्रक पळवला
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: re3
ट्रक पुण्यात सोडून तिघांचे रोख रकमेसह पलायन
5फलटण, दि. 11 : पुणे-पंढरपूर राज्य रस्त्यावर वडजल, ता. फलटण गावच्या हद्दीत मोटारसायकलवरून येऊन रोख आठ हजार रुपये, सीटच्या मागे ठेवलेले चाळीस हजार रुपये, दोन मोबाईल आणि आंब्याच्या पेट्यांनी भरलेला ट्रक तीन चोरट्यांनी चोरून नेल्याच्या गुन्ह्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडजल, ता. फलटण गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री 1 च्या सुमारास श्रीनिवास कृष्णा शीनू (रा. एल. बी. नगर गोगमहल, आंध्र प्रदेश) यांच्या मालकीच्या टाटा ट्रक (एपी-02-टीई-2370) मध्ये पिलेर (आंध्र प्रदेश) येथून आंब्याचे बॉक्स भरून फलटणमार्गे, पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डकडे जात असताना फलटणकडून मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी वडजल, ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण-पुणे रस्त्यावर हा ट्रक अडवला. मोटारसायकलवरील दोघांनी ट्रकच्या केबिनमध्ये दोन्ही बाजूंनी आत घुसून तेथील ट्रकचालक व मालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ट्रकमालकाच्या पायावर लोखंडी  रॉड मारून आणि चालकाच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या खिशातील 8 हजार रुपये रोख व दोन मोबाईल काढून घेऊन दोघांना ट्रकमधून खाली उतरवले. त्यानंतर मोटारसायकल तेथेच सोडून तिघांनी आंब्याच्या पेट्यांनी भरलेला ट्रक पळवून नेला. हा ट्रक पुणे येथे चांदणी चौकात सापडला. मात्र, ट्रकमध्ये चालकाच्या मागील बाजूस सीटखाली ठेवलेले 40 हजार रुपये घेऊन हे तिघे पळून गेले. या प्रकरणी ट्रकमालकाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागटिळे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: