Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

हिमा दासने रचला इतिहास
ऐक्य समूह
Friday, July 13, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: sp1
जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताची धावपटू हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आज इतिहास रचला. अंतिम फेरीत 51.46 सेकंद वेळ नोंदवून हिमाने विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक स्पर्धेत कमी अंतराच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारी 18 वर्षीय हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.
फिनलंडमधील टॅम्पीअर येथे आयएएएफच्या 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत 18 वर्षीय हिमाने अंतिम फेरीत 51.46 सेकंदात 400 मीटर शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले. रुमेनियाच्या आंद्रिया मिकलोसने 52.07 वेळेसह रौप्य तर अमेरिकेच्या टेलर मॅन्सन हिने 52.28 सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. या विजेतेपदाने हिमाने इतिहास रचला. कमी अंतराच्या धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतही हिमाने 52.10 सेकंदात 400 मीटर अंतर कापून पहिल्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. प्राथमिक फेरीतही तिने हे अंतर 52.25 सेकंदात अंतर पूर्ण करून पहिले स्थान राखले होते. आसामची रहिवासी असलेल्या हिमाने एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत 51.32 सेकंदात 400 मीटर अंतर पार केले होते. त्यावेळी ती सहाव्या स्थानी राहिली होती. मात्र, तिने त्यावेळी राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यानंतर हिमाने आपल्या वेळेत सातत्याने सुधारणा केली. अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवताना आपलाच राष्ट्रीय विक्रम 51.13 सेकंद असा सुधारला होता. आता आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत हिमाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दरम्यान, पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत गौरवला पुढची फेरी गाठण्यात अपयश आले होते. बुधवारी झालेल्या प्राथमिक फेरीत त्याच्या हिटमध्ये तो पाचवा तर एकूण धावपटूंमध्ये 42 वा आला होता. गौरवने 48.61 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेतही भारताच्या पदरी निराशा आली. एम. श्रीशंकरने प्राथमिक फेरीत 7.75 मीटर लांब उडी मारली. मात्र, तो सहावा आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: