Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

फ्रान्स जगज्जेता
vasudeo kulkarni
Tuesday, July 17, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: ag1
सर्वार्थाने जागतिक खेळ असलेल्या 21 व्या जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातल्या अटीतटीच्या रोमहर्षक सामन्यात फ्रान्सने जिगरबाज क्रोएशियाच्या बलाढ्य संघाचा 4-2 गोलने पराभव करून अखेर फुटबॉलचे विश्‍वचषकपद जिंकले आहे. तब्बल 20 वर्षांनी दुसर्‍यांदा फुटबॉलचा विश्‍वविजेता होण्याचे फ्रान्सचे स्वप्न रशियाची राजधानी मॉस्कोच्या लुझकिनी स्टेडियममधल्या लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने साकार झाले आणि फ्रान्समध्ये विजयोत्सव सुरू झाला. या अंतिम सामन्यात सर्वार्थाने फ्रान्सचा संघ बलाढ्य होता. पण, अखेरच्या क्षणापर्यंत प्रतिस्पर्धी संघाशी जीव एकवटून झुंजायच्या क्रोएशियाच्या खेळाडूंची जिद्द अनुभवलेल्या मॉस्को आणि जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांना हा अंतिम सामना विलक्षण चुरशीचा होणार याची खात्री असल्यानेच जगभरातले फुटबॉलप्रेमी हा सामना पहायसाठी उपग्रह वाहिन्यांच्या दूरवाणी संचासमोर नजर एकवटून बसले होते. ज्या डीडीयर डेशॉ या प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली  1998 मध्ये विश्‍वचषक जिंकला होता त्याच प्रशिक्षकांच्या कठोर शिस्तीत सराव केलेल्या फ्रान्सच्या संघाने मास्कोत फुटबॉल क्षेत्रात दुसर्‍यांदा हा चषक जिंकणार्‍या  विश्‍वविजेत्या संघांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री हा अंतिम सामना सुरू होताच, या चित्तथरारक झुंजीत क्रोएशियाच्या मारिओ मँडजुकीज याने 18 व्या मिनिटाला आत्मघातकी गोल करीत आघाडी घेतली. पण, 28 व्या मिनिटाला फ्रान्सच्या पेरेसिचने केलेल्या गोलने बरोबरी झाली. हाफ टाईमपूर्वी 38 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रीज मॅनने गोल करीत सामन्यावर प्रभुत्व मिळवले. 59 व्या मिनिटाला फ्रान्सच्या पॉल पोगवाने आणखी एक गोल करून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. फ्रान्सच्याच कॅलियेन एम्पांबेने 65 व्या मिनिटाला चौथा गोल चढवला. पण, शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार्‍या क्रोएशियाच्या मेंडजुकिजने संघासाठी दुसरा गोल केला आणि फ्रान्सचे स्वप्न अखेर साकार झाले. अवघ्या 54 लाख लोकसंख्येच्या क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने जगातल्या दिग्गज, बलाढ्य, देशांच्या संघावर आक्रमकपणे मात करीत या स्पर्धेतली अंतिम फेरी गाठत, राष्ट्रीय अभिमान आणि अस्मितेचे अपूर्व दर्शन जगाला घडवले. अंतिम सामन्यात क्रोएशियाचा पराभव झाला असला, तरी जगातल्या कोट्यवधी प्रेक्षकांची मने मात्र याच देशाच्या संघाने आपल्या चिवट झुंजीच्या खेळाने जिंकली आहेत. फ्रान्स जगज्जेता संघ झाला तर क्रोएशिया उपविजेता संघ झाला. तिसरा क्रमांक बेल्जियमने आणि चौथा क्रमांक इंग्लंंडने मिळवला आहे. फ्रान्सच्या जगज्जेत्या संघाला 256 कोटी रुपये, क्रोएशियाला 189 कोटी रुपये, बेल्जियमला 162 कोटी रुपये आणि इंग्लंडला 142 कोटी रुपयांचे पारितोषक मिळाले आहे. जागतिक फुटबॉल सामन्यांच्या प्रवेश फेरीत जगातल्या दोनशे राष्ट्रांचे संघ उतरतात आणि या स्पर्धेसाठी त्यातल्या 64 संघांची निवड होते. 120 कोटी लोक -संख्येच्या भारताचा फुटबॉल संघ प्रवेश फेरीतही नसतो. ही, क्रिकेट हा आठ-दहा देशात खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ जागतिक नाहीच, पण तरीही भारतीय क्रिकेट रसिक मात्र याच खेळाला जागतिक समजत, क्रिकेटच्या वेडात रंगलेले आहेत. क्रिकेटचा ज्वर चढलेल्या या रसिकांना खर्‍या अर्थाने जागतिक असलेल्या फुटबॉल स्पर्धेत भारताचे नामोनिशाणही नाही, याची खंतही वाटत नाही, हे दुर्दैव होय.

मक्तेदारी संपवली
  या आधीच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत लिओनेल मेसी,  ब्राझिलचा नेमार या खेळाडूंची मक्तेदारी होती. त्यांना प्रचंड यश, कीर्ती आणि पैसाही मिळाला होता. जगातल्या अन्य फुटबॉल स्पर्धातही त्यांचा दरारा आणि दबदबा होता. रशियातल्या जागतिक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही याच खेळाडूंच्या आक्रमक खेळाची चर्चा जगभरातल्या फुटबॉल रसिकात होती. प्रसारमाध्यमे आणि क्रीडा तज्ञांनाही क्रोएशिया अंतिम स्पर्धेत पोहोचेल, असा मुळीच अंदाज नव्हता. पण, क्रोएशियाच्या देशासाठी सर्वस्व पणाला लावून जिंकायसाठीच आक्रमकपणे खेळणार्‍या कर्णधार ल्युका माँड्रिज याच्या संघाने, अजेंटिना, ब्राझिल यासह दिग्गज संघांनाही आपल्या खेळाने अक्षरश: धडकी भरवली आणि असाध्य ते साध्यही करून दाखवले. क्रोएशियाचा कर्णधार ल्युुका माँड्रिज हा गोल्डन बॉलचा तर फिफा यंगप्लेअरचा मानकरी कायलिन एम्बापे ठरला. जुन्या, दिग्गज खेळाडूंची संधी संपवत गोल्डन बूटचा मानकरी हॅरी केन आणि सर्वाधिक गोलचा मानकरी बेल्जियमचा संघ ठरला. या संघाने 16, रशियाने 11, क्रोएशियाने बारा आणि फ्रान्सने दहा गोल नोंदवले. क्रोएशियाच्या इव्हान रॅकिटीनने सर्वाधिक गोल नोंदवायचा विक्रम केला. फ्रान्सचा कर्णधार ह्युगो प्लारिझ आणि क्रोएशियाचा कर्णधार ल्युका माँड्रिज यानी विजयासाठी प्रत्येक सेकंदाला आणि अखेरच्या क्षणापर्यंत कसे झुंजायचे असते, याचा आदर्शच जगातल्या फुटबॉल खेळाडू आणि संघांच्या समोर ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत विश्‍वचषक जिंकायचा, अंतिम सामन्यापर्यंत धडक मारायची या जिद्दीनेच जगातले फुटबॉल संघ जागतिक फुटबॉल स्पर्धेत उतरतात. त्या आधी दोन, दोन वर्षे सामन्यांचा-खेळांचा अफाट सराव करतात. क्रोएशियाच्या यशाचा शिल्पकार प्रशिक्षक ज्लोत्को दालिक हाच असल्याचे जगानेेही मान्य केले आहे. गेले वर्षेभर दालिक क्रोएशियाच्या संघाचा कठोर सराव घेत होते. कठोर मेहनत, प्रचंड आत्मविश्‍वास आणि अखेरपर्यंत हार न मानायची वृत्ती या त्रिसूत्रीवर त्यानी या संघाची बांधणी केली आणि जगातल्या बलाढ्य देशांच्या फुटाबॉल संघांचे आव्हान मोडून काढत अंतिम फेरी गाठायचा दुर्दम्य आत्म विश्‍वास ही या संघाला दिला. युरोपातल्या काही देशांची लोकसंख्या पन्नास लाख कोटींच्या आसपास आहे तर दक्षिण आफ्रिकेतले अनेक देश गरीबही आहेत. पण फक्त देशासाठीच आपण खेळत आहोत आणि देशामुळेच आपण खेळाडू आहोत, याचे भान असलेल्या या देशभक्त खेळाडूंनी गेली अनेक वर्षे जागतिक फुटबॉल स्पर्धा, जागतिक ऑलिंपिक स्पर्धा गाजवल्या आणि या स्पर्धात देशासाठी सुवर्ण पदके मिळवायचा पराक्रम करून दाखवला. भारतात मात्र क्रिकेटचे खेळाडू वगळता अन्य खेळांच्या गुणी आणि होनहार, जागतिक क्रीडा स्पर्धात सुवर्ण पदके मिळवणार्‍या खेळाडूंची उपेक्षा आणि अवहेलना होते. भारतातले खेळाडू जागतिक क्रीडा स्पर्धात पदके मिळवतात, तेव्हा सरकारकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि आश्‍वासनांचा प्रचंड वर्षाव होतो. पुढे मात्र सरकार आणि जनताही त्यांना विसरते. अशा या उपेक्षेमुळेच ऑलिंपिकमध्ये हॉकी संघात खेळलेल्या खेळाडूला पोटापाण्यासाठी शिपायाची नोकरी करावी लागते, जगातल्या सर्व क्रीडा प्रकारात, ऑलिंपिकमध्ये आणि जागतिक फुटबॉल स्पर्धात भारताच्या खेळाडू आणि संघांचा दबदबा निर्माण व्हायचा असेल, तर अन्य खेळांची आणि खेळाडूंची अक्षम्य
उपेक्षा थांबवायला हवी. अन्यथा भारतीय क्रीडा रसिकांना
फक्त दूरचित्रवाणी संचासमोर जागतिक सामने पहायचा आनंद लुटता येईल. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: