Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

कॉपी रोखण्यासाठी संपूर्ण राज्य वेठीला
vasudeo kulkarni
Tuesday, July 17, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: lolak1
राजस्थानमध्ये होणार्‍या 13 हजार पोलीस पदांच्या भरतीसाठी अर्ज भरलेल्या 15 लाख उमेदवारांच्या लेखी परीक्षेसाठी शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस संपूर्ण राज्यालाच वेठीला धरायचा सरकारचा निर्णय आतापर्यंतच्या जगातल्या परीक्षा प्रक्रियेच्या परंपरेत नवा इतिहास घडवणारा ठरला. यापूर्वी हीच परीक्षा सरकारने तीन वेळा जाहीर केली होती. पण, प्रत्येक वेळी प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या घटना उघड झाल्याने, ही परीक्षा  रद्द करून लांबणीवर टाकायची नामुष्की सरकारवर आली. या परीक्षेत कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही साधनाने परीक्षार्थीला कॉपी करता येवू नये, यासाठी सरकारने अत्यंत कडक आणि अभूतपूर्व बंदोबस्तासह नियमावली अंमलात आणली आणि त्याचा त्रास मात्र राज्यातल्या कोट्यवधी बँका, व्यावसायिकांसह जनतेला बसला. परीक्षेच्या काळात सलग दोन दिवस दररोज दहा तास सरकारने राज्यातली संपूर्ण इंटरनेट सेवा सक्तीने बंद केल्यामुळे, बँका, रेल्वे, टॅक्सी, विमानसेवा यासह कोट्यवधी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.
या आधी याच परीक्षेत कॉपीच्या घटना झाल्याने राज्य सरकारने परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांसाठी कोणते कपडे परीक्षेच्यावेळी घातले पाहिजेत, याची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार राज्यातल्या शेकडो परीक्षा केंद्रावर गेलेल्या हजारो परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या शर्टच्या लांब बाह्या, शर्टची कॉलर्स केंद्राबाहेरच कापण्यात आल्या. ज्या मुलींचे कपडे लांब हाताचे होते, त्या बाह्याही कापण्यात आल्या. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मुलींच्याकडील कंगवे, कर्णभूषणे, गळ्यातील दागिने, अगदी गळ्यातला काळा दोरा सुद्धा काढून घेण्यात आला. मुलींना दुपट्टाही वापरायला बंदी होती. परीक्षा केंद्राबाहेर मुले आणि मुलांची अत्यंत कडकपणे पोलिसांनी झडती घेतली. धातूशोधक यंत्राद्वारे सर्व परीक्षार्थींची तपासणी करण्यात आली. काही केंद्रांवर मुलींना अंगावरचे कपडे उतरवून नियमानुसार कपडे घालायची सक्ती करण्यात आली. सर्व परीक्षार्थींना चपला केंद्राच्या बाहेरच काढायला भाग पाडण्यात आले. सर्वच परीक्षा केंद्रात या नियमावलीचे अत्यंत कडक आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात पालन करण्यात आले. सलग दोन दिवस प्रत्येकी चार तासांच्या या प्रश्‍नपत्रिका लाखो परीक्षार्थींना सोडवाव्या लागल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसी टीव्ही कॅमेर्‍याद्वारे परीक्षार्थींवर नजर तर होतीच, पण सर्व परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमरही बसवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांना पर्यायी कपडे नियमानुसार नसल्याने केवळ हाफ पँट आणि बनियनवर परीक्षा द्यावी लागली. एकाही परीक्षा केंद्रात उमेदवाराकडे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असता कामा नये, याचीही खबरदारी घेण्यात आली होती. छायाचित्रांकित ओळखपत्राबरोबरच सर्व परीक्षार्थींना बायोमेट्रिक तंत्राने परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला. काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, परीक्षार्थींच्याबरोबर आलेल्या हजारो पालकांचेही आणि माता असलेल्या उमेदवार महिलांचे प्रचंड
हाल झाले.
सलग दोन दिवस राज्यातील इंटरनेट सेवा, दळणवळण पूर्णपणे बंद ठेवल्याने या डिजिटल आणीबाणीचा तडाखा व्यावसायिक आणि ऑनलाइन व्यवहार करणार्‍या बँकांसह मोठ्या संस्थांनाही बसला. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. सरकारच्या या कडक निर्बंधामुळे जनता हैराण झाली. सरकारच्या या अभूतपूर्व निर्णयाचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी मात्र जोरदार समर्थन करीत या कडक सुरक्षा व्यवस्थेत घेतलेल्या परीक्षेमुळेच अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शीच होईल, असा दावा केला आहे. परीक्षेतील कॉपी आणि घोटाळे पूर्णपणे टाळायसाठी, बंद पाडायसाठी राजस्थान सरकारने घेतलेल्या या परीक्षेमुळे देशातल्या परीक्षा प्रक्रियेत कडक सुरक्षेचा असा नवा पायंडा पडला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: