Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

सातबारा संगणकीकरणाचा घोळ
ऐक्य समूह
Tuesday, July 17, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: vi1
राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या गावांच्या शेत जमिनींच्या सातबारा उतार्‍यांचे पूर्णपणे संगणकीकरण केल्याचा प्रचंड गाजावाजा तीन महिन्यां-पूर्वी सरकारने केला होता. इंटरनेट आणि स्मार्टफोनद्वारे महाराष्ट्र सरकारच्या संकेत स्थळावरून सातबारा उतारा तलाठ्याच्या ई सहीसह जलद मिळेल, अशी ग्वाही देण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात मात्र ही घोषणा केलेल्या दिवसापासूनच या योजनेचे बारा वाजल्याचा अनुभव शेतकर्‍यांना आला. सरकारचे संकेतस्थळ मिळाले, तरी त्यावर सातबारा उतारे मात्र मिळत नव्हते. कधी सर्व्हर डाऊन तर कधी संकेतस्थळ मिळाल्यास संबंधित गावचा सातबारा मिळतही नव्हता. अद्यापही या गोंधळाच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी सातबारा उतारे आवश्यक असल्याने यापुढे ई सहीचा सातबारा उतारा गृहीत धरला जाईल, असे आदेश सरकारने दिले होते. पण, प्रत्यक्षात मात्र एप्रिल महिन्यापासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारेच महा ई सेवा केंद्र आणि इंटरनेट कॅफेतून, व्यक्तिगत संगणकावरून मिळत नसल्याने, शेतकर्‍यांना कर्जाचे अर्ज बँकांना देण्यास अडचणी आल्या. दरम्यान शाळा महाविद्यालये सुरू झाल्यावर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सातबारा उतारा शेतकर्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असल्याने तो मिळवायसाठी प्रचंड धावपळ सुरू झाली. शेतकर्‍यांची ससेहोलपट सुरू झाल्यावर महसूल आयुक्तांनी पुन्हा तलाठ्याकडून हाताने लिहिलेले सही शिक्क्यांचे सातबारा उतारे ग्राह्य धरावेत, असे आदेश दिले. पण, तलाठ्याला शोधणे आणि त्याच्याकडून सातबारा उतारा मिळवायसाठी पुन्हा धावपळ करायची वेळ शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर आली. सातबारा उतार्‍याच्या संगणकीकरणाचा हा घोळ काही अद्यापही संपलेला नाही. महा ई सेवा केंद्रातून पीडीएफ स्वरूपातील डिजिटल सातबारा उतारा घेऊन त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि शिक्का घेतल्यानंतरच संबंधित उतारा ग्राह्य धरण्यात येत असून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरणाची मोहीम तर फसलीच, पण या सार्‍या प्रक्रियेत राज्यातल्या लक्षावधी शेतकर्‍यांची प्रचंड ससेहोलपट झाली. आता तर सरकारने यासाठी घेतलेल्या सर्व्हरची क्षमता संपल्याने तूर्त स्वाक्षरीयुक्त सातबारा बंदच करण्यात आला आहे. आता केवळ डिजिटल सातबारा उतारा महा ई सेवा केंद्रातून मिळू शकतो. महाभूलेख संकेतस्थळावरून स्मार्टफोन, इंटरनेट, महा ई सेवा केंद्रातून डिजिटल सातबारा उतारा मिळत असला तरी त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि शिक्का घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी जाहीर केले आहे. परिणामी शासकीय कामासाठी पुन्हा तलाठ्याच्या सहीचेच डिजिटल सातबारा उतारे मिळवायच्या प्रक्रियेत शेतकरी मात्र भरडून निघाले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: