Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होणार
ऐक्य समूह
Thursday, August 02, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
पहिल्या स्थानकाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारीत : प्रभू
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : कोकण रेल्वेला पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणार्‍या वैभववाडी-कोल्हापूर या 103 कि.मी. रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर दहा नवीन स्थानके उभारण्यात येणार असून त्यातील पहिल्या स्थानकाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारीत होईल, असेही प्रभू यांनी सांगितले.
सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्लीत कोकण रेल्वे प्रशासनाची बैठक झाली. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोकण रेल्वे संदर्भात आढावा घेण्यात आला. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती देण्यात आली. या 103 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे तर उर्वरित 50 टक्के खर्च महाराष्ट्र राज्य सरकार करणार आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वेमार्गाने जोडला जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसह कोकणचा विकास होऊन पर्यटनालाही चालना मिळणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले. या मार्गाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.     
रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी यांच्यामार्फत 40 अब्ज डॉलर खर्चून तेलशुद्धीकरणाचा अजस्र प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प 2022 सालापर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरून कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर
या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे. कोकण रेल्वेच्या सेवेत सुधारणा करतानाच अधिकाअधिक गावे कोकण रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी दहा नवीन स्थानके उभारली जात आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. यातील पहिल्या स्थानकाचे उद्घाटन जानेवारी 2019 मध्ये होईल. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित 50 टक्के खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे, असे
त्यांनी सांगितले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: