Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्धवट जळालेले दोन मृतदेह आंबेनळी घाटात आढळले
ऐक्य समूह
Wednesday, August 08, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: re1
5महाबळेश्‍वर, दि. 7 : पोलादपूर-महाबळेश्‍वर राज्य मार्गावर पायटा गावच्या हद्दीत दोन मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलादपुरात एकच खळबळ उडाली आहे.
घातपात, की आत्महत्या याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील पायटा गावाजवळ रस्त्यापासून जवळच 5 ते 7 फूट खोल दरीत आंबेनळी घाटात दोन मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता या ठिकाणी उत्तर प्रदेशची पासिंग असणारी एक दुचाकी व 35 ते 40 वयोगटातील महिला व एक 3 वर्षे वयाच्या बालकाचा मृतदेह आढळून आला असून या ठिकाणी पोलिसांना पेट्रोल सदृश वस्तू असणार्‍या बॉटल मिळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र फिरवली असता महाड शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असल्याने सदर मृतदेह शीतल ललित गंगवाल या महिलेचा असून दुसरा मृतदेह तिचा तीन वर्षांचा मुलगा देवांग ललित गंगवाल याचा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून पुढे आले असून पोलीस तपासाला वेग आला आहे
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेची माहिती समजताच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे, सणस यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: