Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये मेजर राणेंसह चार जवान शहीद
ऐक्य समूह
Wednesday, August 08, 2018 AT 10:52 AM (IST)
Tags: na1
घुसखोरी रोखली; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
5श्रीनगर, दि. 7 (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये घातपात घडवून आणण्याच्या इराद्याने घुसखोरी करण्याचा आठ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी मंगळवारी उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. मात्र, दुर्दैवाने या धुमश्‍चक्रीत भारतीय लष्कराचे मेजर के. पी. राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर काश्मीर खोर्‍यातील बांदीपोरा परिसरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये सोमवारी मध्यरात्री आठ दहशतवादी घुसखोरी करत असल्याची खबर मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी या परिसरात मोहीम सुरू केली. जवानांनी या दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि मोर्टार शेलही डागले. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या धुमश्‍चक्रीत मेजर राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या परिसरात आणखी दहशतवादी असल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली शोधमोहीम मंगळवारीही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा, आई, वडील, बहीण असा परिवार आहे. मीरा रोड येथील शीतलनगर पसिरातील हिरल सागर या इमारतीत राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीचे असून 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहतात. मेजर राणे यांच्या हौतात्म्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद राणे यांनी मीरा रोड येथील हॉली क्रॉस शाळेत शिक्षण घेतले होते. शहीद कौस्तुभ यांची पत्नी कनिका या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते. मेजर कौस्तुभ यांना यंदा सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या सैन्यातील कामगिरीचा राणे कुटुंबीयांसह तेथील रहिवाशांना अभिमान होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: