Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ठिय्या आंदोलनादरम्यान शांतता अबाधित ठेवू
ऐक्य समूह
Wednesday, August 08, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: lo2
मराठा क्रांती मोर्चा व जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
5सातारा, दि. 7 : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी सातारा जिल्ह्यात होत असलेले ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करून सातारा जिल्ह्याची शांतता  व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती व  जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती व जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,  अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, एलसीबीचे पो.नि. पद्माकर घनवट, सातारा शहरचे पो.नि. सारंगकर यांची उपस्थिती होती. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलनपर्व सुरू आहे. दि. 9 ऑगस्ट रोजी सर्वत्र महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 10 तालुक्यांमध्ये त्या, त्या तहसील कार्यालयासमोर 11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे तर सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सातारा शहर व तालुक्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधव ठिय्या देवून बसतील. त्याचवेळी पाच भगिनी पोवई नाका येथे जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर पाच भगिनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील. दुपारी 3 वाजता ठिय्या आंदोलनाची सांगता होईल. या व्यतिरिक्त मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुसर्‍या कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन केले जाणार नाही. आंदोलनामध्ये काही हिंसक प्रवृत्ती घुसण्याची शक्यता लक्षात पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा. यापूर्वी सातार्‍यात झालेली घटना लक्षात घेवून पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर वॉच ठेवावा. असे प्रकार करणार्‍यांचा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीशी संबंध असणार नाही, असेही यावेळी समन्वय समितीच्यावतीने बैठकीत जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले. सातार्‍यात गेल्या काही आठवड्यांपूर्वी झालेला हिंसक प्रकार लक्षात घेता व सर्वसामान्यांना त्याचा त्रास होवू नये आणि निरपराधांना झळ  सोसावी लागू नये यासाठी समन्वय समितीच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी सातार्‍यात यापूर्वी झालेल्या प्रकारात जे निरपराध आहे त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. निरपराधांना विनाकारण गोवले जावू नये, अशी मागणीही समन्वय समितीच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र शासन मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गंभीर असून सध्या एकमेव त्याच विषयावर काम सुरू आहे. मराठा बांधवांच्या पदरात निश्‍चित काही तरी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करून आंदोलन हे शांततेच्याच मार्गाने केले जावे. आरक्षणाची मागणी  मान्य व्हायची आणि ज्यांना लाभ होईल त्यांच्यावर अगोदरच गुन्हे दाखल असायचे. मग त्याचा लाभ त्यांना कसा मिळेल? असे घडू नये म्हणून आता शांततेचा मार्ग स्वीकारा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
समन्वय समितीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सातार्‍यातले आंदोलन शांततेने होईल. मात्र, जर या आंदोलनात घुसून कुणी गैरप्रकार केला तर किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला तर त्या संबंधितावर कारवाई करावी लागेल, असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 
त्याचवेळी मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या योजना लागू केल्या आहेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या पातळीवर सातत्याने बैठका आयोजित केल्या जातील व त्याची माहिती समन्वयकांना दिली जाईल, असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
खा. उदयनराजे - आ. शिवेंद्रराजेंचे आवाहन
समन्वय समितीच्या बैठकीला खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचे समन्वय समितीमध्ये समर्थकही उपस्थित होते. त्यांनी नेत्यांच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्हीही आग्रही आहोत. यासाठी होत असलेले आंदोलन लोकांना त्रासदायक होवू नये म्हणून 9 तारखेचे आंदोलन शांततेत करा, असे आवाहन खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनीही केले आहे.
शासन सकारात्मक
 दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. आरक्षणाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया शासनाने वेगाने सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांनी आंदोलन शांततेने करावे, खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले.  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या दोन्ही योजना शासनाच्या महत्त्वकाांक्षी योजना आहेत. या दोन्ही योजनांची महाविद्यालयांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व महाविद्यालयांना केल्या आहेत. या योजनेविषयी प्रत्येक 15 दिवसाला आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करावे.  सातारा जिल्हा हा शांताप्रिय असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यातील शांतता, एकोपा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही जिल्हाधिकारी सिंघल यांनी यावेळी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: