Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

अस्मितेचा ध्रुवतारा
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: ag1
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या  निधनाने या राज्याच्या राजकारणात आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या तेजाने तळपणारा द्रविडी अस्मितेचा ध्रुवतारा निखळला आहे. तमिळ भाषा आणि तमिळी संस्कृतीच्या भक्कम पायावरच स्थापन झालेल्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे सलग 50 वर्षे अध्यक्षपद आणि या राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवायचा विक्रमही त्यांनी केला होता. भारताचे पहिले माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या  70 वर्षाच्या देशाच्या राजकीय घडामोडींचे, घटनांचे ते साक्षीदार होते. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि तमिळ आणि मागास, वंचित जनतेचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला. तमिळनाडूतल्या तिरुवरजवळच्या थिरूवलै या छोट्याशा खेड्यात 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या करूणानिधी यांचे मूळ नाव दक्षिणामूर्ती. अल्पवयातच  प्राथमिक शिक्षण सोडल्यावर त्यांनी तमिळ चित्रपटांचे पटकथालेखन सुरू केले. 1938 मध्ये अलगिरी स्वामी यांचे भाषण ऐकून त्यांनी जस्टीस पार्टीत प्रवेश केला आणि ते सक्रिय राजकारणात उतरले. द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे संस्थापक ई. व्ही. रामस्वामी आणि सी. एम. अण्णा दुराई यांच्यात मतभेद झाल्यावर त्यांनी अण्णादुराईंना साथ दिली. 1957 मध्ये करुर जिल्ह्यातल्या कुलीथली मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग बारावेळा ते विधानसभेत विजयी झाले. 13 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकायचा विक्रमही त्यांनी केला. 1967 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची राज्यातली सत्तेची मक्तेदारी संपवत द्रविड मुनेत्र कळघम पक्षाने सत्ता मिळवली तेव्हा माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. अण्णादुराईंचे विश्‍वासू सहकारी असलेले करुणानिधी 1972 मध्ये अण्णादुराईंच्या निधनानंतर मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुखही झाले. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे तेच सर्वेसर्वा आणि प्रमुख होते. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज एम. जी. रामचंद्रन यांनी तमिळ चित्रपट क्षेत्रात अण्णादुराई यांच्याच चित्रपटाद्वारे प्रवेश केला होता. हे दोघे मित्र होते. पण, राजकारणात मात्र पुढे ते परस्परांचे प्रतिस्पर्धी झाले. 1972 मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी करुणानिधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत पक्ष फोडला आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली. द्रविड अस्मितेचा जयघोष करीत स्थापन झालेल्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षातल्या फुटीमुळे पक्षाची सत्ता गेली. एम. जी. आर. मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच राजकीय कारकिर्दीत जयललितांचा तमिळनाडूच्या राजकारणात उदय झाला आणि सूडाच्या राजकारणाने तमिळनाडूचे राजकारणही गाजायला लागले. जयललितांनी मुख्यमंत्रिपदही मिळवले. पण त्यांच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करीत, करुणानिधी यांनी पुन्हा सत्तेवर पकड बसवली आणि मुख्यमंत्रिपदही मिळवले. जयललितांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आजारी असलेल्या करुणानिधी यांना निवासस्थानी अटक करून तुरुंगातही डांबले होते. पण, पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर करुणानिधी यांनीही जयललितांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच तुरुंगात डांबले. 1996 मध्ये आणि नंतर 2006 मध्ये ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यावर सत्ता असताना भ्रष्टाचाराचे आरोप अनेकदा झाले. जयललितांनी सत्तेचा वापर करीत करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाचे वर्चस्व संपवायची केलेली कटकारस्थाने यशस्वी झाली नाहीत. शेवटपर्यंत त्यांची लोकप्रियता आणि जनमानसातले आदराचे स्थान कायम राहिले.

वंचितांचा तारणहार
  तमिळनाडूच्या सत्तेवर असताना करुणानिधींनी गरीब, मागासवर्गीय महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना अंमलात आणल्या. भूमिहिनांना जमिनींचे वाटपही केले. सर्वसामान्य तमिळ जनतेचे तारणहार अशी प्रतिमा असलेल्या या नेत्याने वर्णवादी आणि जातिव्यवस्थेवर कठोर प्रहार करीत समाजातल्या वंचित-तळगाळातल्या लोकांना मानवी हक्क आणि अधिकार कायद्याने मिळवून दिले. त्यामुळेच राजकीय चढ -उतारातही त्यांचे जनमानसातले स्थान ध्रुवतार्‍यासारखे अढळच राहिले. राजकीय पराभवाचे विजयात रूपांतर करायच्या निर्धारानेच ते पराभवाने कधी खचले नाहीत आणि राजकारणातून बाजूलाही झाले नाहीत. वयाच्या नव्वदीनंतरही ते सक्रिय राजकारणात राहिले. तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम पक्षात फाटाफूट झाली. दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. पण, या प्रादेशिक पक्षातल्या सत्तासंघर्षाचा लाभ काँग्रेस आणि अन्य पक्षांना घेता आला नाही. प्रादेशिक सत्तेच्या बळावर त्यांनी केंद्रातल्या राजकारणात आणि सत्तेतही काही काळ वर्चस्व गाजवले. प्रादेशिक पक्षही केंद्रातल्या सत्तेच्या राजकारणात प्रभावी आणि प्रबळ ठरू शकतात, सत्तेच्या बुद्धिबळाचा पट उधळू शकतात, हे ही त्यांनी दाखवून दिले. दिल्लीच्या राजकारणावर कामराज यांच्यानंतर तमिळी नेतृत्वाचा छाप पाडणारे ते दुसरे नेते होते. तमिळी अस्मिता आणि भाषेच्या मूळ राजकीय सूत्राशी त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत आणि केंद्र सरकारच्या रागा-लोभाचीही पर्वा केली नाही. श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेने श्रीलंका सरकारशी सशस्त्र संघर्ष सुरू केला तेव्हा करूणानिधी यांनी तमिळी वाघांना सहानुभूती बरोबरच सक्रिय मदतही केली होती आणि त्याच कारणासाठी त्यांचे सरकारही केंद्राने बरखास्त केले होते. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला.  जगातल्या तमिळ भाषकांच्या एकजुटीलाही  पाठिंबा दिला. अखिल भारतीय तमिळ साहित्य संमेलनालाही  सरकारतर्फे  सक्रिय सहाय्य केले. आणीबाणीत त्यांचे सरकार बरखास्त झाल्यावर, लोकशाही आणि स्वातंत्र्याला जाहीर पाठिंबा देणार्‍या करुणानिधींनी ‘मुरासोली’या वृत्तपत्राद्वारे आणीबाणीच्या विरोधात धाडसाने लेखनही केले होते. तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कथा आणि पटकथा लेखक असलेल्या करुणानिधी यांनी ‘पराशक्ती’ या चित्रपटासाठी कथा लेखन करून, तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर सलग 55 वर्षे ते तमिळ चित्रपट आणि उपग्रह वाहिन्यांच्या मालिकांसाठीही कथा, संवाद लेखन करीत होते. विधवा विवाह, अस्पृश्यता निवारण अशा सामाजिक सुधारणांचा त्यांनी चित्रपटकथांद्वारे हिरिरीने पुरस्कार केला. कथा/कादंबर्‍या नाटकांचेही लेखन केले. कलेचे वरदान लाभलेला कलावंत-‘कलैनार’ असे बिरूद तमिळ जनतेनेच त्यांना बहाल केले होते. प्रतिभावंत साहित्यिक, निर्भीड पत्रकार आणि समतावादी राजकारणी असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले करुणानिधी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी, तमिळनाडूच्या जनतेला त्यांचे विस्मरण कधीही होणार नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: