Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्याच्या संपात सर्व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा सहभाग
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : राज्यातील कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांच्या प्रश्‍नावरून राज्य समन्वय समितीने वेळोवेळी शासनाशी चर्चा केली आहे. परंतु कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांबाबत, मागण्यांबाबत न्याय निर्णय न झाल्यामुळे समन्वय समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसाचा राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात राज्यातील सर्व जिल्हा परिषद संवर्गाचे कर्मचारी सहभागी आहेत. राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा साताराचे  सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे आता तरी शासनास जाग येईल, अशी अपेक्षा असल्याचे राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष एस.एल. चिकटूळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना तत्काळ लागू करावा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व अतिउत्कृष्ट कामासाठी देण्यात येणार्‍या आगाऊ वेतनवाढी पूर्ववत सर्व जिल्हा परिषदांना देण्याची कार्यवाही करावी, तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीस नव्याने पदनिर्मिती करावी, ग्रामसेवक हे पद रद्द करून ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ठेवावे, कंत्राटी पद्धत रद्द करण्यात यावी, समान काम समान वेतन धोरण राबवण्यात यावे, महिला ग्रामसेवकांना महिला शिक्षिकाप्रमाणे दुर्गम, अतिदुर्गम भागात नियुक्तीने अगर बदलीने पदस्थापना देण्यात येऊ नये, बदली आदेश सुधारणा करण्यात यावी. नोव्हेंबर 2005 नंतर
नेमणूक झालेल्या ग्रामसेवक कर्मचार्‍यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे, ती अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामपंचायतीचे कामकाज देखरेख नियंत्रण मार्गदर्शन तपासणी होण्यासाठी 20 ग्रामपंचायतीस अगर जिल्हा परिषद मतदारसंघास एक याप्रमाणे विस्तार अधिकारी (पंचायत) पदे गौतम चटर्जी व लोंढे समितीने शिफारस केल्याने विस्तार अधिकारी अशी 505 पदे निर्माण करावी. केंद्रीय कर्मचार्‍याप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, ग्रामपंचायत स्तरावर एम.जी. नरेगा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, अनुकंपा तत्त्वावरील सेवा भरतीपूर्वीप्रमाणे विनाअट करण्यात यावी या मागण्या आहेत. त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर चिकटूळ, रियाज शेख, वनिता इंगळे, अमोल धुमाळ, संजय जोशी, प्रकाश भोये, श्रीमती वाघमारे उपस्थित होत्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: