Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

सामाजिक माध्यमामुळे मनोरुग्णता
vasudeo kulkarni
Thursday, August 09, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lolak1
गेल्या दहा वर्षात भारतात झालेल्या दूरसंचार क्रांतीने सारे जग ‘मोबाईल’द्वारे मुठीत आले. जगाच्या कानाकोपर्‍याशी क्षणार्धात संपर्क साधणे मोबाईलमुळे शक्य झाले. अलीकडच्या पाच वर्षात मोबाईलवरील ‘लघुसंदेश’ (एसएमएस)ची संकल्पनाही स्मार्टफोनच्या नव्या साधनामुळे मागे पडली. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या तंत्राचा आणि विविध अ‍ॅप्सच्या समावेशाने स्मार्टफोनद्वारे व्हिडिओ संभाषणासह, छायाचित्रे, ध्वनि-चित्रफिती क्षणार्धात पाठवायची सोय उपलब्ध झाली. छायाचित्रेही टिपता यायला लागली. सारे जग आणि मित्र, नातेवाईक, सग्यासोयर्‍यांचा परिवारही या नव्या तंत्राद्वारे संपर्काच्या साखळीत जोडला गेला. पण, या नव्या तंत्रज्ञानाचा-सुविधांचा वापर करणारे लाखो युवक आणि युवती या साधनाच्या आहारी आणि नंतर अति आहारी गेल्यामुळे, युवापिढीत आता फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप या सामाजिक माध्यमाच्या वेडाबरोबरच मनोरुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. रात्रंदिवस व्हॉटस्अ‍ॅपच्या अति वेडात, लाखो युवकांना त्याचे व्यसनच लागले. जेवताना, खाताना, प्रवास करताना सातत्याने स्मार्टफोनवर बोलायचे किंवा पहाणे म्हणजेच अशांचे दैनंदिन जीवन झाले आहे. हजारो युवक युवती तर रात्री- बेरात्री उठून आपल्या स्मार्टफोनवरचे स्टेटस् पाहतात. एक क्षणही त्यांना स्मार्टफोनशिवाय घालवता येत नाही. स्मार्टफोन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. लाखो युवकांना तर स्मार्टफोनद्वारे इंटरनेट सुविधेचा वापर करीत इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषेतले चित्रपट पहायचे, गाणी ऐकायचे प्रचंड वेड लागलेले आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काही खाजगीपणा असतो आणि आपल्या खाजगी जीवनातल्या सर्वच घटना काही सार्वजनिक करायच्या नसतात, याचे भानही या स्मार्टफोनच्या नादी लागलेल्यांना राहिलेले नाही. सेल्फीच्या नादात गेल्या दोन वर्षात रेल्वे रुळ ओलांडताना, दुर्गम कडेकपारीवरून कोसळून, तलावात बुडून भारतात शेकडो युवक- युवतींचे बळी गेले आहेत. झोपेचा वेळ वगळता लाखो युवक आणि युवती दिवसभरात आठ- दहा तास स्मार्टफोनचा सलग वापर करतात. रस्त्याने चालताना, गाडी चालवतानाही स्मार्टफोनचा वापर केल्याने, हजारो जणांना अपघाती प्राण गमवावे लागले आहेत. सरकार, वैद्यकीय तज्ञ, सामाजिक संस्था, संघटनांनी वारंवार मोबाईल-स्मार्टफोनचा अतिवापर मानवी शरीराला घातक असल्याने, तो कमी करा, आवश्यक तेवढाच स्मार्टफोनचा वापर करा, असे सल्ले देऊनही काही उपयोग झालेला नाही.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आता मनोरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे अलीकडेच निष्पन्न झाले आहे. स्मार्टफोन शिवाय आपल्याला जगताच येणार नाही, असे वाटणार्‍या युवक-युवतींवर स्मार्ट-फोनवरच्या विविध अ‍ॅप्सवरील भासमानतेने गारूड घातल्याने महानगरी मुंबईत स्वमग्न आणि मनोरुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुंबईच्या केईएम आणि सर जे. जे. रुग्णालयात स्मार्टफोनच्या आहारी केलेल्या आणि त्यामुळे मानसिक रुग्ण झालेल्या युवक- युवतींवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या मानसिक रुग्णांना स्मार्टफोनच्या भ्रामक जगातून बाहेर काढायसाठी मानसिक उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या पथकाने विविध वैद्यकीय उपचारही सुरू केले आहेत. सामाजिक माध्यमावरील अनेक माहिती, चित्रे यांचा मनावर घातक परिणाम होवू शकतो, सातत्याने स्मार्टफोन वापरल्याने मेंदू बधिर होतो. काही वेळा त्याचा प्रकृतीवरही गंभीर परिणाम होतो आणि पुढे मानसिक अवस्था बिघडते आणि असे युवक, युवती मनोरुग्ण होतात असा मानसोपचार करणार्‍या डॉक्टरांचा निष्कर्ष आहे. पालकांनी अल्पवयीन मुला-मुलींच्या हाती स्मार्टफोन देवू नये आणि युवक-युवतींनी स्मार्टफोनचा वापर मर्यादितच करावा आणि मानसिक विकृतीपासून दूर राहावे, असा या
डॉक्टरांचा
सल्ला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: