Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रशासनाच्या आवाहनानंतर धनगर समाजाचे आंदोलन स्थगित
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 8 : धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील प्रांताधिकारी/तहसीलदार कार्यालयासमोर धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी गेली 11 दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन प्रशासनाच्या आवाहनानुसार आज स्थगित करण्यात आले.  कृती समितीच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकार्‍यांना कृती समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात फलटण येथे सर्वप्रथम दि. 29 जुलै रोजी या समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी भेट देवून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या आहेत. आपण आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलना दरम्यान दररोज निश्‍चित केलेल्या गावातील समाजबांधव आणि फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख मंडळी आंदोलनस्थळी धरणे आंदोलनात सहभागी होत असताना एक दिवस आपल्या शेळ्या मेंढ्या, घोड्यांसह सर्वच कुटुंबीयांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे आंदोलनस्थळी दररोज सकाळ/ सायंकाळ जागरण, गोंधळ, गजीनृत्य, ढोलताशाचे खेळ अशा विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. त्याचबरोबर दुपारच्या वेळेत समाजातील प्रमुख मंडळी आंदोलनाच्या मागणीसंबधी त्याबाबत शासनाच्या भूमिकेसंबंधी माहिती देत असत. प्रामुख्याने धनगर व धनगड ही प्रशासनाच्या लेखणातील चूक असून धनगड जातीचे कोणीही महाराष्ट्रात नसल्याने धनगर समाजालाच एसटीमध्ये समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून बारामती येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण स्थळास भेट देवून हे उपोषण मागे घ्या आणि आम्हाला सत्ता मिळण्यासाठी सहकार्य करा. त्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्या समाजाच्या मागणीनुसार एसटीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र प्रत्यक्षात ते झाले नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दि. 10 ऑगस्ट रोजी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर सर्व आजी- माजी आमदारांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. दि. 14 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर शांततेत मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आहे. दि. 24 ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आहे. दि. 8 सप्टेंबर रोजी चौंडी, जि. अहमदनगर येथे महामेळावा घेवून धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील समाजबांधवांनी या महामेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: