Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा आरक्षणासाठी आज ‘महाराष्ट्र बंद’
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: mn1
नवी मुंबई, ठाण्याला वगळले; आंदोलनासाठी आचारसंहिता
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने 58 मूक मोर्चे काढूनही आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने उद्या, 9 ऑगस्टला क्रांतिदिनी सकल मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर बंद पाळण्यात येणार असून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचे आवाहन सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी आज केले. या आंदोलनासाठी मराठा समन्वय समितीने आचारसंहिताही जाहीर केली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आजवर शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला मागच्या आठवड्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्यांचे सत्रही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाणे व नवी मुंबईत मागच्या आठवड्यात आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे तेथे उद्या बंद न करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. बंदऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. विविध नेत्यांकडून वेगवेगळी भूमिका घेतल्याने उद्या नेमका कुठे बंद होणार व कुठे नाही याबाबत संभ्रम होता; परंतु सकल मराठा समाजाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी आज मुंबईत दादर शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई व ठाणे वगळता संपूर्ण राज्यात उद्या बंद पाळण्यात येईल, अशी माहिती दिली.
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत गेल्या साडेतीन वर्षांपासून अधिक काळ राज्य सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे.     
राज्य सरकारकडून वेळोवेळी फक्त आश्‍वासनेच देण्यात आली. मात्र, आता मराठा समाजाचा संयम संपला आहे. आम्ही शांततेतच आंदोलन करणार असून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा जाधवराव यांनी दिला. दरम्यान, शाळा, महाविद्यालये आणि दूध, औषध दुकाने, अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे जाधवराव यांनी स्पष्ट केले.
बंदसाठी आचारसंहिता जाहीर
9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करताना सकल मराठा समाजाने
कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता जाहीर केली आहे.
* बंद शांततेच्या मार्गाने असला पाहिजे.
* बंदमध्ये शासकीय वा खाजगी मालमत्तेची तोडफोड करू नये.
* मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करावेत.
* उद्याचा बंद 24 तास असेल.
* कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे.
* पोलीस व प्रशासनला सहकार्य करा.
* बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
* सोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करावी.
* अफवांवर विश्‍वास ठेवू नका
* मराठा सेवकांनी शांत राहून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा.
* आपल्या माणसांना त्रास होईल, असे वर्तन करू नये.
* मराठ्यांनी लढाई जिंकली आहे, तहात हरणे मान्य नाही.
* आत्महत्या करून प्रश्‍न सुटणार नाही, हातातोंडाशी आलेला घास खायला आपण       असणे महत्त्वाचे आहे.
* कोणतेही गालबोट न लावता 9 ऑगस्टचा बंद आपण सर्वांनी यशस्वी करावा.
* बंद असा करायचा, की पुढच्या वर्षी फक्त क्रांतिदिन नाही तर ‘मराठा क्रांतिदिन’       असे नमूद केले पाहिजे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात येईल, असेही ते म्हणाले. 9 ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येत असून भविष्यात 9 ऑगस्ट हा ‘मराठा क्रांतिदिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे केदार सूर्यवंशी यांनी सांगितले. आंदोलनावरून मराठा समाजात फूट पडलेली नाही तर प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आंदोलन करत आहे. गुरुवारी होणारे आंदोलने शांततेत पार पडणार असून कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केल्याचे जाधवराव म्हणाले. मुंबईसह राज्यात प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आंदोलन करणार आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी आश्‍वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाधवराव यांनी सांगितले.
ठाणे, नवी मुंबईत बंद नाही
मागच्या आठवड्यात आंदोलनात झालेल्या हिंसक घटनांमुळे ठाणे व नवी मुंबईत बंदऐवजी केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. 25 जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आ. नरेंद्र पाटील यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन दिली होती.
पुणे जिल्ह्यात शाळा, कॉलेज बंद
दरम्यान, उद्याच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या ‘महाराष्ट्र बंद’च्या घोषणेच्या अनुषंगाने शाळा व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्राथमिक, माध्यमिक, मनपा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी स्थानिक सुट्टी म्हणून ग्राह्य धरण्यात यावी, असे निवेदन पुणे महापालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण शिक्षणाधिकारी दीपक माळी आणि प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी काढले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: