Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एम. करुणानिधी अनंतात विलीन
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn3
संपूर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
5चेन्नई, दि. 8 (वृत्तसंस्था) : पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी (वय 94) यांच्यावर चेन्नईतील मरिना बीचवर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणानिधी यांच्या पार्थिवावर त्यांचे राजकीय गुरू अण्णादुराई यांच्या समाधीशेजारी दफनविधी करण्यात आला. करुणानिधी यांचे मंगळवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले होते. मात्र, त्यांच्या अंत्यविधीसाठी मरिना बीचवरील जागा तमिळनाडू सरकारने नाकारल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाद संपुष्टात आला. करुणानिधींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या ‘थलैवा’च्या अंतिम दर्शनासाठी तेथे जनसागर उसळला होता. त्याचबरोबर दिग्गज नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान देवेगौडा, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते कमल हसन, रजनीकांत व अन्य दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे
करूणानिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. करुणानिधी यांच्या अंत्ययात्रेला दुपारी 4 च्या सुमारास सुरुवात झाली. लष्कराच्या जवानांनी तिरंगा ध्वज करुणानिधींचे पुत्र स्टालिन यांच्याकडे सोपवला. करुणानिधींचे पार्थिव तिरंग्यात लपेटून शवपेटीत ठेवण्यात आले. लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या वाहनात करुणानिधींचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी लाखोंचा जनसागर अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. अंत्ययात्रेत करुणानिधींचे चाहते व नागरिक ‘थलैवा’, ‘अन्नाविन थम्बया’ अशा घोषण देत होते. अनेकांना अश्रू अनावर होत होते.
मरिना बीचवर अंत्ययात्रा पोहोचल्यावर करुणानिधी यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. तत्पूर्वी, तिन्ही संरक्षण दलांच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून करुणानिधी यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी करुणानिधींचे पुत्र स्टालिन, अझागिरी, मुथ्थू, मुलगी खा. कनिमौळी व कुटुंबीय उपस्थित होते. अनेक दिग्गज नेतेही अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित होते. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल दिल्लीसह सर्व राज्यांमधील राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. कर्नाटक सरकारने आज एक दिवसाची सुट्टी दिली तर तमिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब करण्यात आले. एकदाही खासदारपद न भूषविलेल्या नेत्यासाठी संसदेचे कामकाज तहकूब करण्याची ही भारताच्या लोकशाहीतील बहुदा ही पहिली घटना असावी.
चेंगराचेंगरीत तीन ठार
करुणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. समर्थक नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. दरम्यान, चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी, करुणानिधी यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी तमिळनाडू सरकारने मरिना बीचवरील जागा नाकारल्याने द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सकाळी त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर स्टालिन, कनिमौळी व करुणानिधी यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: