Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरकारी कर्मचार्‍यांचा संप आजही सुरू राहणार; चर्चा निष्फळ
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या तीन दिवसांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठकांचे सत्र सुरू होते; परंतु त्यात तोडगा न निघाल्याने उद्या, दि. 9 रोजी तिसर्‍या दिवशीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करणे, रिक्त पदे भरणे, सेवानिवृत्तीचे वय 60 करणे आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा तीन दिवसांचा संप सुरू केला आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. संपामुळे सरकारी कार्यालयातील कामकाज आजही विस्कळीत होते. संपावर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिव डी. के. जैन यांनीही बैठक घेतली; पण तोडगा निघाला नाही. आतापर्यंत चार फेर्‍या झाल्या तरी सरकारचे तेच पालुपद कायम असल्याने मार्ग निघू शकला नाही, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीनंतर सांगितले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचे कारण सांगून आपली हतबलता व्यक्त केली. त्यामुळे जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करा, पण महागाई भत्त्याची 21 महिन्यांची थकबाकी दिवाळीपर्यंत दोन टप्प्यात द्या, असा पर्याय आम्ही दिला आहे. याबाबत रात्रीपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर उद्या संप सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. मात्र, चेंबूर येथील रिफायनरीमधील अपघातामुळे मुंबईतील आरोग्य कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचारी कामावर रुजू होतील, असे ते म्हणाले.
तातडीने निर्णय घ्या ः खा. अशोक चव्हाण
दरम्यान, सरकारच्या खोट्या आश्‍वासनांना कंटाळून शेतकरी, एस.टी. कर्मचार्‍यांनंतर आता राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची राज्य सरकारी कर्मचार्‍यांची मागणी तत्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
खा. चव्हाण म्हणाले, या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलने केली तरी सरकारने केवळ आश्‍वासने दिली आहेत. या संदर्भात मी 9 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर आहेत. मात्र, त्यावर चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी सरकार कारवाईच्या धमक्या देत आहे. सरकारच्या आडमुठेपणामुळे मराठा आरक्षण आंदोलन चिघळले असून आताही सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: