Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

भक्तिमार्गाचे प्रचारक संत नामदेव
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: st1
महाराष्ट्राच्या वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे प्रचारक, उत्तर भारतात भक्तिमार्गाचा प्रसार करणारे संत नामदेव महाराज यांची दि. 9 ऑगस्ट (आज) रोजी 668 वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांनी केलेल्या देशव्यापी भक्तिसंप्रदायाच्या प्रसाराचा हा मागोवा!     
   भारतीय संस्कृतीत संतांनी केलेले कार्य मोलाचे आहे. कर्मठांच्या, सनातन्यांच्या रूढी, परंपरांना शह देऊन समानतेचा धर्म शिकवणार्‍या संतांनी भारतीयांचे जीवन व्यापले आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास म्हणजे महाराष्ट्राचे जणू पंचप्राण आहेत. त्यांची अमृतवाणी महाराष्ट्रीय मनाला सतत संजीवनी देत आली आहे.
संत नामदेवांनी तर भारतात सर्वत्र
भागवत धर्माचा प्रसार केला. गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, पंजाबमध्ये शांती,
क्षमा, दयेचा कल्याणकारी उपदेश करून समतेच्या गुढ्या उभारल्या. यावनी आक्रमणाच्या काळात स्वत:चे स्वत्व सांभाळून ठेवण्याचा महामंत्रच त्यांनी दिला असे म्हटले तर वावगे
ठरणार नाही.
सर्वांभूती समदृष्टी
संत नामदेवांच्या चरित्राची, कवित्वाची मोहिनी जबरदस्त आहे. सगुण, निर्गुण भक्तीची सांगड घालून त्यांनी सर्वांभूती असलेल्या परमेश्‍वराची उपासना केली. आपल्या रसाळ वाणीने, अभंगांनी प्रत्येकाच्या मनात ती भक्ती जागृत केली. व्यक्ती-व्यक्तीत मानला जाणारा भेद या भक्तीला मान्य नाही. सर्वांभूती समदृष्टी हेचि भक्ती गोड मोठी अशी त्यांची भक्तीबद्दलची कल्पना आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी
संत नामदेव स्वत: सगुण भक्त होते. त्यामुळे त्यांच्या उपासना पद्धतीत कीर्तनाला महत्त्वाचे स्थान आहे. नाचू कीर्तनाचे रंगी असे म्हणणार्‍या संत नामदेवांचे अभंग म्हणजे त्यांच्या हळूवार अंत:करणाची स्पंदने आहेत. आकाशात मेघाला पाहून मोराने आनंदाने नर्तन करावे त्याप्रमाणे विठ्ठलास पाहून नामदेवांची स्थिती हासे, नाचे, बोले, स्फुंंदतु डुलतु। गातु अहर्निश नाम तुझे॥ अशी होत असे. संत ज्ञानेश्‍वरांच्या मते भक्तिमार्गातील नामसंकीर्तन भक्तीचे
स्वरूप आहे. संत नामदेवांनी संकीर्तन भक्ती ही ज्ञानदीप प्रकाशित करण्याचे साधन आहे असे  सांगितले.
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी। सर्व सांडूनी माझाई। वाचे विठ्ठल रखुमाई॥ कीर्तनाचे रंगात नाचत असता जगामध्ये आत्मज्ञानाचा दीप लावू. सर्व ममत्व सोडून वाणीने विठ्ठल-रखुमाई म्हणून राहू. सर्व विश्‍वाचे अधिष्ठान असणारा चिन्मय परमात्मा हेच माझे पूर्णरूप आहे. त्याची सत्ता, माझी सत्ता यात भेद कीर्तनाच्या माध्यमातून ते त्यांनी लोकांना सांगितले. सर्वांभूती परमेश्‍वर, दया, क्षमा, शांती उपदेश केला.
सर्वांभूती दया, सर्वभावे करुणा. जिथे मी-तू पणा मावळला हा संत नामदेवांचा कीर्तनातील निरुपणाचा विषय होता. मनुष्याला नम्रता शिकवण्यासाठी कीर्तनाचे नमन असावे असे ते म्हणतात.
प्रचारकी बाणा
संत नामदेवांच्या एकूण स्वभावात खरा प्रचारकी बाणा दिसून येतो. कीर्तन रंगात तल्लीन झालेल्या या आतुर भक्ताने विठ्ठलाबरोबरच उभ्या महाराष्ट्राला वेड लावले. नामदेव कीर्तन करी। पुढे नाचे पांडुरंग। हे वर्णन म्हणजे त्यांच्या  कीर्तन कौशल्याची प्रत्यक्ष पावतीच आहे. ऋतुजा, भाव संपन्नता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण विशेष आहे. त्यांच्या मृदुमधुर, सरल सुंदर बोलातून त्यांचे सत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व प्रकट झाले आहे. त्यांचे कवित्व त्यांच्या आंतरजीवनाशी सर्वस्वी सुसंगत आहे. कवी, त्याचे काव्य
यातील सामरस्याचे सौंदर्य त्यांच्या अभंगांमध्ये प्रकर्षाने जाणवते.
नामयाची वाणी। अमृताची वाणी।
कर्मकांडाचे प्रस्थ माजवणार्‍या समाजाला ज्ञानदीप दाखवल्याशिवाय शुद्ध भक्तीचे स्वरूप कळणार नाही. कीर्तनाने ही गोष्ट साध्य होईल, असे त्यांना खात्रीने वाटले. सामुदायिक उपदेशाचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात पडल्याची त्यांची खात्री झाली. कीर्तनामुळे श्रोता, वक्ता या दोघांनाही सुख प्राप्त होते. म्हणून कीर्तन ही श्रेष्ठ भक्ती आहे असे त्यांना वाटते. उपदेशाच्या भूमिकेतील संत नामदेवांची कीर्तने सदाचरणाची, भागवत धर्म प्रसारणाची शिकवण देणारी आहेत. त्यांचा एकेक अभंग त्यांचा आत्मलेख आहे. त्यांचे काव्य म्हणजे त्यांच्या अंत:करणाचे स्पंदन आहे. ते त्यांचे प्रकट चिंतन आहे. काव्यरचना हा त्यांच्या दृष्टीने विठ्ठल भक्तीचाच पावन प्रकार आहे. उत्कृष्ट भावगीतास आवश्यक असलेली आत्मकेंद्रित वृत्ती संत नामदेवांजवळ आहे. त्यांच्याच काव्यात यशस्वी पंथप्रचारासाठी प्रभावी ठरणारी समाजोन्मुख वृत्तीही आढळून यावी हे विशेष आहे. त्यांनी आपल्या अभंगातून धर्मविषयक, नीतिविषयक विचारांचे आदर्श उभे केले आहेत. त्यांनी जसे मराठीत अभंग रचले त्याचप्रमाणे हिंदीत सुद्धा अभंग रचले. परमेश्‍वराच्या ठायी त्यांची अन्योन्य निष्ठा आहे. भक्तीगर्भ प्रतिपादन, ईश्‍वराविषयीची असीम निष्ठा, संत ज्ञानेश्‍वरांबद्दलचा अपार आदर त्यांच्या कीर्तनात दिसतो. नामयाची वाणी अमृताची वाणी हे जनाबाईंचे उद्गार त्यांच्या रसाळ कीर्तनाची साक्ष पटवणारे आहेत.
पंजाबमध्ये धर्मजागृती
मराठी भक्तीपंथांपैकी महानुभाव, वारकरी या दोन्हींचा पंजाबमधील जनतेने फार पूर्वीच आदरभावाने स्वीकार केला आहे. आजही जयकृष्णी समाज या नावाने महानुभावांचे तत्त्वज्ञान तेथे प्रसिद्ध आहे. महानुभावांच्या पूर्वीच तेथे वारकर्‍यांच्या विचारांची विजय पताका घेऊन संत नामदेव पोहोचले होते. आजही त्यांच्या मठ मंदिरामुळे वारकरी विचारांचा ठसा पंजाबवासीयांच्या मनावर फार चांगल्या प्रकारे टिकून आहे. 14 व्या शतकाच्या प्रथमार्धात ते तेथे गेले. 1॥ तपाहून अधिक काळ तेथे राहून त्यांनी तेथील वातावरण-धर्म जागृतीने गजबजून सोडले.
इभै बीठलु, उभै बीठलु, बीठल बिनु संसार नही। भागथंनथरि नामा प्रणवै पूरी हरिउ तु सरब मही॥ असा परम सत्यचा, भक्तीच्या सार्वभौमत्वाचा डंका त्यांनी तेथे घुमवला. विसोबा खेचरांकडून गुरुपदेश झालेला असल्यामुळे  त्यांची मूळची सगुण साकाराच्या भक्तिभावात रमलेली वृत्ती निर्गुण निराकार अनंताच्या आराधनेकडे आकृष्ट झाली होती. अशा उज्ज्वल संस्काराचे धन घेऊन परप्रांती आलेले संत नामदेव एकटेच नव्हते. त्यांच्याबरोबर असंख्य विठ्ठल भक्त होते. संत नामदेव नुसतेच प्रचारक किंवा केवळ ब्रह्मानंदी टाळी लागलेले वारकरी म्हणून तेथे वावरले नाहीत तर त्यांनी आपल्या भावमधुर, विचारगर्भ वाणीने तेथे नवचैतन्य निर्माण केले. भक्तिमार्गाची वाट प्रशस्त केली. गुलामगिरीत पडलेल्या तेथील बांधवांना हरिरंगाची गोडी लावली. त्यांचे मनोधैर्य वाढवले. ते गावोगाव गेले. जनताजनार्दनासमवेत राहिले. त्यांच्या हृदयमंदिरी अलौकिक प्रेमाची ज्योत जागवली. म्हणूनच गुरू नानकांनी, त्यांच्या परंपरेतील गुरूंंनी संत नामदेवांविषयी अपार कृतज्ञता प्रकट केली आहे. शिखांच्या श्री गुरुग्रंथ साहेब या पवित्र धर्मग्रंथात संत नामदेवांची 61 पदे घेतली असून त्याला नामदेवकृत 61 पदे ग्रंथसाहेबातील मुखबानी म्हणून ओळखली जातात. 13 व्या शतकात वारकरी संप्रदायाची विचारधारा, कार्यपद्धत यांचे महत्त्व पंजाब, संयुक्त प्रांत, राजपुताना या उत्तरेकडील प्रांतांना पटवून देण्याचे काम संत नामदेवांनीच केले. भागवत धर्मीय भक्तिमार्गाचे महत्त्व उत्तरेकडील लोकांना पटवून देणारे संत नामदेव पहिले संत होते. संत नामदेव हेच संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्याबरोबरच वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. उत्तर प्रदेशात कर्मकांडात मग्न असलेल्या सामान्य जनतेला नामसाधनेचा मार्ग त्यांनीच दाखवला. हिंदी भाषेतले तेच पहिले संत. संत कबीरांनी त्यांचाच भक्तिपरंपरेचा वारसा पुढे चालवला. आयुष्यातला उत्तरार्ध त्यांचा पंजाब आणि उत्तर भारतातच गेला होता. हिंदी भाषेवर अपार प्रभुत्व असलेल्या संत नामदेव महाराजांच्या अभंग वाणीनेच हिंदी भाषेतही दोहे आणि अभंगांची मालिका सुरू झाली. वर्णव्यवस्थेला नाकारत सर्व मानवजात एक आहे आणि मानवतेची सेवा हाच खरा विश्‍वधर्म आहे,
अशी शिकवण त्यांनी आपल्या अभंगवाणीद्वारे दिली. पंजाबातील घुमान येथे त्यांचे मंदिर
आहे. या मंदिराद्वारे त्यांच्या भक्तिमार्गाचा
प्रसारही सुरू आहे.
- भानुदास शं. बाचल, वाई.
मोबा : 9822972348 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: