Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

बालगृहातील बालकांची विक्री
vasudeo kulkarni
Thursday, August 09, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: vi1
मदर टेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘चॅरिटीज ऑफ मिशनरीज’ या संस्थेच्या झारखंड राज्याची राजधानी रांची येथील ‘निर्मल हृदय’ या संस्थेतील चार बालकांची विक्री झाल्याची घटना उघड झाल्याने, प्रचंड खळबळ उडाली आहे. या संस्थेच्या संचालक अनिमा इंदिवर, यांनी संस्थेतून बालके विकल्याची कबुली दिल्याने या घटनेचा तपास सुरू करून पोलिसांनी आतापर्यंत संस्थेच्या संचालिकेसह चौघींना अटक केली आहे.
या बालिकागृहात कुमारी माता प्रसूतीसाठी येतात. प्रसूत झाल्यावर त्यांची अर्भके या संस्थेत सांभाळायसाठी ठेवली जातात. पण, या बालकांची विक्री झाल्याचे प्रकरण झारखंड राज्याच्या बालकल्याण समितीने उघडकीस आणले आणि पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली. या संस्थेत 120 कुमारी मातांची बालके संगोपनासाठी होती. त्यातल्या अनेक बालकांची विक्री झाल्याचे रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिश गुप्ता यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर, ख्रिश्‍चनांच्या मार्फत चालवल्या जाणार्‍या या सेवाभावी संस्थेवर बालकांची विक्री केल्याच्या  आरोपाचा इंडियन बिशप्स काँग्रेसचे सचिव बिशप थिओडोर मस्कारेन्हस यांनी इन्कार केला होता. संस्थेची बदनामी करावी, यासाठी हे आरोप होत असल्याचा त्यांचा दावा होता. पण, झारखंडच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष रूपा शर्मा यांनी बालकांची विक्री होत असल्याच्या तक्रारीत सत्यता असल्याचे पोलिसांना आढळले. या बालगृहातील एका बालकाची विक्री  संस्थेतल्या सेविकांनी उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र येथील दांपत्याला एक लाख वीस हजार रुपयांना केल्याचे पोलिसांनी शोधून काढले. तीन महिलांनी गेल्या सहा महिन्यात चार बालकांची विक्री केल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले. निर्मल हृदय या संस्थेतून पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे 2015-18 या चार वर्षात 450  कुमारी गर्भवती माता प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यातल्या 170 मातांच्या बालकांच्या नोंदी सापडल्या. 280 बालकांचा पत्ता पोलिसांना लागला नाही. या बालकांची विक्री अनेक राज्यातल्या दांपत्यांना लाखो रुपये घेऊन केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. उत्तर प्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल या राज्यात दांपत्यांना विकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस खात्याने विशेष पथकांचीही नियुक्ती केली आहे. मानव तस्करीचा हा गंभीर गुन्हा सेवाभावी संस्थेकडून झाल्याने, या संस्थेच्या कारभाराचाही जाहीर पंचनामा सुरू झाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: