Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुन्ना झिंग्राच्या प्रत्यार्पणाला परवानगी
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: na2
पाकचा दावा थायलंड कोर्टाने फेटाळला
5बँकॉक, दि. 8 (वृत्तसंस्था) : भारताला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी’ कंपनीचा सदस्य आणि छोटा शकीलचा जवळचा सहकारी मोहम्मद सलीम ऊर्फ मुन्ना झिंग्राला भारतात आणण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. थायलंडच्या न्यायालयाने झिंग्राच्या भारताकडील प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला आहे. झिंग्रा हा आपला नागरिक असल्याचा पाकचा दावा सबळ पुराव्याअंती फेटाळत तो भारताचाच नागरिक असल्याचे न्यायालयाने सांगितले. या निर्णयामुळे पाक तोंडघशी पडला आहे.
पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा सहकारी मुन्ना झिंग्रा हा सप्टेंबर 2000 पासून बँकॉकच्या तुरुंगात असून त्याच्या नागरिकत्वावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू होता. झिंग्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाकिस्तान आणि थायलंड सरकारमध्ये असलेल्या कैदी हस्तांतरण करारानुसार त्याला सुरुवातीला पाकिस्तानच्या हवाली करण्यात येणार होते. मात्र, भारताने झिंग्राला आपल्या ताब्यात देण्यात यावे यासाठी सबळ पुराव्यानिशी दावा केला होता. त्यावर गेल्या वर्षी एप्रिलपासून थाई न्यायालयात झिंग्राच्या प्रत्यार्पणासाठी खटला सुरू करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात थाई कायद्यानुसार झिंग्राला गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याची डिसेंबर 2016 मध्ये तुरुंगातून सुटकाही करण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याला त्याच्या मूळ देशात पाठवण्यात आले नव्हते. पाकिस्तानने झिंग्रा हा आपला नागिरक असल्याने त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. यासाठी आयएसआयने त्याचा पाकिस्तानी पासपोर्ट सादर केला होता. मात्र, भारताच्यावतीने सीबीआय आणि परराष्ट्र मंत्रालयाने झिंग्राच्या  बोटांचे ठसे, त्याच्या त्वचेवरून काढलेले डीएनए नमुने, त्याच्या मुलीच्या जन्म-मृत्यूचे दाखले, त्याचा रहिवाशी दाखला व कॉलेजमधील प्रवेश प्रमाणपत्र असे ठोस पुरावे थाई न्यायालयाकडे पाठवले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: