Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूजसह खटाव तालुक्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: re5
5वडूज/मायणी, दि. 9 : मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत वडूज शहरासह खटाव तालुक्यातील सर्व व्यवहार, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये उत्स्फूर्तपणे शंभर टक्के बंद ठेवण्यात आली. मराठा बांधव आणि भगिनींनी वडूज येथे हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मायणीतील मराठा युवकांनी वडूजपर्यंत तब्बल 27 कि.मी.ची पदयात्रा काढून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.
वडूज येथील ठिय्या आंदोलनात मराठा बांधव व भगिनींनी आरक्षणाच्या प्रश्‍नावर शासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पथनाट्य व मैदानी खेळातून सरकारचा निषेध करून आंदोलनात जिवंतपणा आणला. सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात जाली. मुख्य बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटागंणमार्गे मोर्चा तहसील कार्यालयासमोर आला. मोर्चात मराठा युवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाल्यावर अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. सिद्धी संतोष भोसले या शाळकरी मुलीने आरक्षणासंदर्भात भाषण करून लोकांची मने जिंकली. यापूर्वीच्या आंदोलनात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे 15 ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास मंत्र्यांना खटाव तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
तिसरा डोळा उघडायला लावू नका!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक घोषणांमुळे मावळ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी असंख्य लढाया जिंकल्या होत्या. त्यावेळची ‘हर हर महादेव’ ही घोषणा सरकारने लक्षात घ्यावी. आतापर्यंत महादेवाने दोन डोळे उघडले आहेत. तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होईल, याचे भान ठेवावे, असा इशारा एका बांधवाने दिला.
मराठा आरक्षणाचा ‘खेळ’...
तहसील कार्यालय परिसरात फूटबॉल खेळून या सरकारने मराठा आरक्षणाचा कसा ‘फूटबॉल’ केला आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तर कबड्डीसारखा मैदानी खेळ खेळून ‘सरकार, मागासवर्ग आयोग विरुद्ध मराठा समाज’ हा सामना कशा पद्धतीने सुरू आहे, हे दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला.
युवकांची 27 कि.मी. पदयात्रा
5मायणी : दरम्यान, मायणीसह परिसरातील गावांमध्ये बाजारपेठा व इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. मराठा बांधवांनी सकाळी मायणी गावातून घोषणाबाजी करत फेरी काढली. मराठा युवकांनी 27 कि.मी. अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी वडूज येथे जाऊन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला. चांदणी चौकातून वडूजपर्यंत पदयात्रा काढून तहसीलदारांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चातील वीस युवकांचे शिष्टमंडळ हातात भगवा ध्वज घेऊन सूर्याचीवाडी, कातरखटाव असे मार्गक्रमण करत वडूज येथे तहसील कार्यालयात पोहोचले. तेथे बेल्हेकर यांनी निवेदन स्वीकारले. मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सपोनि. संतोष गोसावी यांनी मराठा मोर्चाच्या बैठकीत शांततेचे आवाहन केले होते. त्यानुसार बंद शांततेत पाळण्यात आला. या संयमी आंदोलनाचा आदर करत सपोनि. संतोष गोसावी यांनीही या युवकांसोबत पायी चालून त्यांना प्रोत्साहन दिले. गोसावी यांच्या या कृतीमुळे आंदोलक युवकांमध्ये पोलिसांबद्दल मैत्रीभाव वाढला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: