Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आरोपीला जामीन देण्याचा न्यायाधीशांना अधिकार
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: na2
तिहेरी तलाक कायद्यात सुधारणेला मंजुरी
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : पत्नीला तिहेरी तलाक दिल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या मुस्लीम पुरुषाला जामीन देण्याचा अधिकार न्यायाधीशांना देण्याची सुधारणा या संबंधीच्या कायद्यात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.
तिहेरी तलाक देणे हा अजामीनपात्र गुन्हा असला तरी या तरतुदीमुळे न्यायाधीश परिस्थितीनुसार जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेऊ शकतील. मुस्लीम पुरुषांनी तडकाफडकी तलाक देण्याची इस्लाममधील प्रथा तिहेरी तलाकविरोधातील विधेयकामुळे बेकायदेशीर होणार आहे. गेल्या वर्षी हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले असले तरी अद्याप राज्यसभेत मंजूर झालेले नाही. राज्यसभेत भाजपप्रणीत रालोआची सदस्यसंख्या कमी आहे, त्यामुळे तेथे हे विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही. हे विधेयक केवळ तिहेरी तलाक किंवा ‘तलाक-ए-बिद्दत’पुरतेच लागू आहे. या विधेयकामुळे मुस्लीम पीडितेला न्यायाधीशांकडे दाद मागता येणार आहे, स्वत:साठी व मुलांसाठी नुकसानभरपाई मागायची तरतूदही यात आहे. अल्पवयीन मुलांचा ताबाही पीडित महिला मागू शकते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: