Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओगलेवाडीत आंदोलकांचा जनावरांसह रस्त्यावर ठिय्या
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re4
5ओगलेवाडी, दि. 9 : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या बंदला ओगलेवाडी व विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड-विटा रस्त्यावर सकाळपासून आंदोलकांनी अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला. दिवसभर ओगलेवाडीची बाजारपेठ बंद राहिली.
कराड-विटा मार्गावर कृष्णा कॅनॉल, पाटणकर मळा, रेल्वे पूल, टेंभू रस्ता,  ओगलेवाडी मुख्य चौक, वनवासमाची, राजमाची येथे आंदोलनकांनी रस्त्यावर उतरून रास्ता-रोको करत ठिय्या आंदोलन केले.  रेल्वे पुलावर आंदोलनकर्त्यांनी गाय, म्हैस, शेळ्या आणून रास्ता-रोको केला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या तर राजमाची व ओगलेवाडी चौकात भजन करून आंदोलन करण्यात आले. पाटणकर मळा येथे टायर जाळून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परिसरातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेली ओगलेवाडीतील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. या बंदमुळे बाहेरगावाहून रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची मात्र वडाप व इतर वाहतूक बंद असल्यामुळे मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांना कराडपर्यंत पायी चालत जावे लागले. या बंदमध्ये ओगलेवाडी व विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: