Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बैलजोडीसह कुडाळ विभागात लक्षवेधी मराठा क्रांती मोर्चा
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re1
 5कुडाळ, दि. 9 : मराठा आरक्षणाबाबत शासनाने केलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आवाहन केल्या नुसार गुरुवारी जावली तालुक्यातील सर्व बाजार कडकडीत बंद पाळण्यात आला. कुडाळ येथे काढण्यात आलेल्या मराठा मोर्चात बळीराजा आपल्या ढवळ्या-पवळ्यांच्या बैलजोडीसह सहभागी झाल्याने हा मोर्चा लक्षवेधी ठरला होता. कुडाळ येथे परिसरातील हुमगाव, सोमर्डी, शेते, म्हसवे, सोनगाव, सर्जापूर आर्डे, बेलावडे, दरे, आलेवाडी अशा गावातील हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे तसेच शासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी रवींद्र परामणे, राजेंद्र शिंदे, जयदीप शिंदे, वीरेंद्र शिंदे, संजय शिंदे,  संतोष शेलार, संदीप परामणे, महेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला. यावेळी संयोजकांनी मोर्चावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणांना आवाहन केले. पोलिसांना सहकार्य करा. व्यक्तिगत व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका, असे आवाहन महेश पवार यांनी केले. त्यानंतर हा मोर्चा कुडाळ बाजारपेठेतून मेढा येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाला. करहर, सोमर्डी, हुमगाव, सयगाव व आनेवाडी येथेही बंद पाळण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: