Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात कडकडीत बंद
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:44 AM (IST)
Tags: mn1
जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या; जागर, गोंधळाने आंदोलकांमध्ये चैतन्य
5सातारा, दि. 9 : मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी सातारा शहर व तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.  ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण जिल्हा दणाणला. जिल्हावासीयांनी कडकडीत बंद पाळून इतिहास घडवला. बंदमुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. एस.टी. सेवा, वडाप व रिक्षा वाहतूक, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. रस्ते ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मराठा समाजाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्राच्या या कुलदैवतांना सकल मराठा समाजाने साकडे घालून मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आणि गोंधळ घातला. यंदाच्या आंदोलनाने शांतता पाळून चांगला संदेशही दिला. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली.
दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, मोर्चे, ठिय्या आंदोलन करून मराठा बांधवांनी शासनाचा निषेध केला. वाईत काही बांधवांनी गणपती घाटावर कृष्णा नदीत उतरून अर्धजलसमाधी आंदोलन केले. महागणपती मंदिरात घंटानाद व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले. एकसर येथे टायर पेटवून रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच पोहोचून आंदोलन हिंसक होणार नाही, याची दक्षता घेतली. मायणी, ता. खटाव येथील मराठा युवकांनी वडूजपर्यंत तब्बल 27 कि.मी.ची पदयात्रा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. वडूज येथे तहसील कार्यालय परिसरात फूटबॉल खेळून या सरकारने मराठा आरक्षणाचा कसा ‘फूटबॉल’ केला आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तर कबड्डीसारखा मैदानी खेळ खेळून ‘सरकार, मागासवर्ग आयोग विरुद्ध मराठा समाज’ हा सामना कशा पद्धतीने सुरू आहे, हे दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला. पिंपोडे बुद्रुक येथे एकाने मुंडन करून शासनाचा निषेध केला.
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोचाने पुकारलेल्या बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. सातारा शहर व उपनगरांमधील दुकाने बंद होती. नोकरदार, व्यावसायिक घराबाहेर पडले नाहीत. सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरलेे होते. सर्व बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. त्यांनी बंदबाबत कोणतेही आवाहन केलेे नसतानाही स्वराज्याच्या राजधानीतील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, वाहतूकदार, पेट्रोल पंपचालकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. रस्ते ओस पडले होते. पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक परिसर, करंजे पेठ, राधिका रोड, खालचा रस्ता, मोती चौक, विसावा नाका, गोडोली, शिवराज चौक येथील दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट होता. कोडोली, संभाजीनगर, विलासपूर, प्रतापसिंहनगर, कृष्णानगर, संगममाहुली या उपनगरांमधील रस्तेही ओस पडले होते. आनेवाडी येथील टोल नाका मोकळा मोकळा वाटत होता.
‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘आरक्षण द्या नाही तर खुर्ची खाली करा’ अशा घोषणांनी अवघा जिल्हा दणाणून गेला. सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात कडकडीत बंद असताना अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल्स, हॉस्पिटल्स सुरू होती. बंदमध्ये सातारा शहर परिसरातील वडाप वाहतूक व रिक्षा बंद होत्या. त्यामुळे नेहमी गजबजलेले रिक्षा व वडापचे थांबे ओस पडले होते
बॉम्बे रेस्टॉरंट-वाढे
फाट्यावर बंदोबस्त
यापूर्वी मराठा क्रांती ठोक मोर्चादरम्यान झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा, खेड, कृष्णानगर, संगमनगर, प्रतापसिंहनगर रस्ता, संगममाहुली फाटा या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्तासाठी विशेष पथके नेमली होती. बॉम्बे रेस्टॉरंट, प्रतापसिंहनगर, माहुली फाटा परिसरात दर अर्ध्या तासाला पोलिसांची गस्त सुरू होती.
जोरदार ठिय्या आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा बांधव ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमले. सातारा शहर व परिसरातून दुचाकींवरून व चारचाकी वाहनांमधून आलेल्या मराठा बांधवांनी आपल्या वाहनांवर भगवे झेंडे लावले होते. ‘एक मराठा लाख मराठा’ असे घोषवाक्य लिहिलेल्या टोप्या त्यांनी परिधान केल्या होत्या. चौकाचौकात भगवे झेंडे व टी-शर्ट घालून  युवक घोषणा देताना दिसत होते. प्रत्येक गावाच्या वेशीवर नागरिक व युवक एकत्र आले होते. त्यामुळे बघावी तिकडे भगवी लाट निर्माण झाली होती. घर तेथे घराणे आणि घराणे तेथे कुळ असतेच. कुल तेथे कुलधर्म किंवा कुलाचार पाळलाच पाहिजे, हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी खंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’ तर  देवीच्या कुलाचारात ‘गोंधळ’ प्रमुख आहे.  संपूर्ण महाराष्ट्राच्या कुलदैवतांना सकल मराठा समाजाने साकडे घालून मराठा आरक्षणासाठी जागर आणि गोंधळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातला. तहानभूक विसरून बेभान झालेल्या समाजाने   ‘राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे, हक्काच्या आरक्षणाचा नवस पुरा कर’, असं साकडंच जणू आपल्या कुलदैवतांना घातलं.
मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने  ठिय्या आंदोलन करण्यात आले. इतकी वर्षे समाज आरक्षणाची मागणी करत असताना कुठल्याही राज्यकर्त्याला पाझर फुटत नसल्याने आंदोलकांनी कुलदैवतांचा धावा केला. भजन, गायनातून व्यथा मांडल्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून त्यांना वंदन करून भजनाला सुरुवात झाली. मराठा समाजाला परंपरा, संस्कार आहे. आरक्षणाच्या मुद्यावर ही शक्ती एकवटते. आंदोलनात सादर केलेल्या वीरगीतांनी मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा दिला. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या  गीतामुळे आंदोलक वीररसात बुडाले. ‘शूर आम्ही सरदार’ या गीताने उपस्थितांचा हरूप वाढवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात,’ ‘जयोस्तुतेऽ जयोस्तुतेऽऽ श्रीमहन्मंगले शिवास्पदे’ या गीतांनी चैतन्य निर्माण केले. ऊनपावसाची पर्वा न करता गर्दी जागची हलली नाही. ‘राजमाता जिजाऊंच्या शिकवणुकीवर महाराष्ट्र उभा राहिला तर पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणावर वारकर्‍यांनी स्वर्ग पाहिला’. ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘माउली-माउली’ या गीताने शक्ती-भक्तीचे परमोच्च शिखर गाठलं.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट मोर्चे निघाले. या आंदोलनाला विचार असल्याने ते यशस्वी झाले. विचार चांगले असतील तर यश मिळते तसाच विठ्ठलाचा ध्यास वारीतून वारकरी घेतात, हे सांगताना ‘रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी’ याची सादरकर्त्यांनी केलेली मांडणी आंदोलकांना भावली. ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी,’ ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या भक्तिगीतांनी आंदोलनाचे नाते विठ्ठलभक्तीशी जोडण्यात आले.
अंबामाता, भवानी, दुर्गा या शक्तिदेवतेच्या विविध रूपांचे संकीर्तन म्हणजे गोंधळ.  श्री खंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’ व देवीच्या कुलाचारात ‘गोंधळ’ महत्त्वाचा असतो. ‘उदे ग अंबे उदे’ म्हणत मराठ्यांनी आरक्षणासाठी गोंधळ घातला. ‘आली हो गोंधळाला..गोंधळाला तुळजाभवानी आई’, असे म्हणत त्यांनी साकडे घातले. ‘लल्लाटी भंडार’ हे गीतही सादर झाले.   जागरणात खंडेरायाचा धावा झाला. ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या’, अशी विनवणी आंदोलकांनी केली. ‘जयदेवा जयदेवा शिवमार्तंडा’ ‘खंडूबाची कारभारीन.. झाली बानू धनगरीण’, या गीतांवर आंदोलक तल्लीन झाले. त्यांचा दिवसभराचा शिणवटा निघून गेला.   ‘चांगभलं रं चांगभलं..देवा जोतिबा चांगभलं,’ असे म्हणत कोल्हापूरच्या जोतिबाचाही धावा करण्यात आला. मराठा समाजाचे प्रखर वास्तव मांडणारे ‘देरे, देरे आता तरी देरे, जवळील गेलं.. पोरं बाळ उघड्यावर पडली, उपाशी रहिली, जमत नसेल तर घरी जारे घरी जारे’ हे गीतही एका वृद्धाने सादर केले. जागर, गोंधळानंतर मावळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी गर्दीत उत्साह  व ऊर्जा निर्माण केली. शेती हा मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून त्यावरील निष्ठा व प्रेम व्यक्त करणारी शेतकरी गीते सादर झाली. ‘कुर्‍या चालल्या रानात’, ‘झुजूमुंजू पहाट झाली’, ‘भलगरी दादा भलं रं’ या गीतांनी आंदोलकांना मंत्रमुग्ध केले. ‘हे भोळ्या शंकरा’ या गीताला उत्स्फूर्त दाद मिळाली. आंधळ्या, बहिर्‍या सरकारला मराठा समाजाचा टाहो ऐकू येत नसल्याने वेगळ्या पद्धतीने केलेला पुकारा सरकारपर्यंत नक्की पोहोचेल, असा विश्‍वास आंदोलकांना वाटला. लिंब येथील ‘स्वर सह्याद्री सप्तक’ व ‘निर्मिती भजनी मंडळ’ यांचा या कार्यक्रमात
सहभाग होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: