Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यातील सकल मराठ्यांचा एल्गार
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 9 : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या  प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधवांनी गुरुवार, दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी एल्गार करत पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलनाला प्रारंभ केला. मराठा समाजाच्या न्याय आरक्षण मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याची भूमिका मराठा सकल समाजाच्या या ठिय्या आंदोलना दरम्यान घेण्यात आली असून मराठा समाज पाटण तहसील कार्यालयासमोर आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार गुरुवार, दि. 9 रोजी पाटण तालुक्यात ठिय्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्यासह समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांनी या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून येथील नवीन बस स्थानक परिसरात जमा होण्यास सुरुवात केली. बसस्थानक परिसरातील सह्याद्री कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आलेल्या मराठा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन मराठा युवतींच्या हस्ते झाले. त्यानंतर सकल मराठा समाजातील बांधवांनी एकत्रित येवून कराड-चिपळूण महामार्गावरून,  झेंडा चौक, लायब्ररी चौक, राजवाडा, सिद्धार्थनगर मार्गे तहसील कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पाटण तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा बांधवांनी भगव्या झेंड्यासह सहभाग घेतला. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही यासह घोषणांनी पाटण शहर परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकरांच्या हातामध्ये असणार्‍या झेंड्यांमुळे सारा परिसर भगवा झाला होता. सदर मोर्चा पाटण तहसील कार्यालयासमोर आला असता त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये मराठा समाजातील बांधवांनी ठिय्या मांडला. यावेळी मराठा युवतींच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आत्महत्या केलेल्या तसेच आंदोलनादरम्यान बळी गेलेल्या मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये धारातीर्थी पडलेले शहीद जवान मेजर कौत्सुभ राणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मराठा ठिय्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करून आंदोलना दरम्यान ज्या मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या मराठा बांधवांचा सर्व न्यायालयीन लढा मोफत लढविणार असल्याचे पाटण तालुका बार असोसिएशनच्यावतीने जाहीर करण्यात आले.
या मराठा मोर्चामध्ये आ. शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर, हर्षद कदम, विक्रमबाबा पाटणकर, गोरख नारकर, राजाभाऊ काळे यांच्यासह पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: