Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण तालुक्यात कडकडीत बंद; ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 9 : मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये फलटण शहर आणि तालुक्यातील अगदी छोट्या गावात, वाडी-वस्तीवरही बंद 100 टक्के यशस्वी झाला. एस.टी., रिक्षा, हॉटेल्स, बँका, शाळा, महाविद्यालये आणि सर्व ठिकाणी बाजारेपठा बंद ठेवून सर्व जण उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.
येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मोठा जनसमुदाय आज सकाळी एकत्र आला. छ. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर आरती झाली. उपस्थित मराठा बांधवांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. ‘आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
दरम्यान, फलटण शहर, साखरवाडी, सुरवडी, तरडगाव, आदर्की, हिंगणगाव, सासवड, आसू, पवारवाडी, राजाळे, गोखळी, राजुरी, कोळकी, जाधववाडी, बिबी, घाडगेवाडी, गिरवी, जिंती यासह तालुक्यातील सर्वच गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.
फलटण-सातारा रस्त्यावर बिबी फाटा, फलटण-लोणंद रस्त्यावर बडेखान, फलटण-पंढरपूर रस्त्यावर राजुरी, फलटण-आसू रस्त्यावर राजाळे व गोखळी पाटी, फलटण-बारामती रस्त्यावर सांगवी, फलटण-पुसेगाव रस्त्यावर वाखरी येथे काटेरी झुडपे टाकून, फलटण-दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी, फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले येथे आंदोलकांनी ठाण मांडून वाहतूक पूर्ण बंद केली होती. दरम्यान, सुरवडी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. सुरवडी, साखरवाडी, खराडेवाडी व परिसरातील मराठा बांधवांनी फलटण-लोणंद रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. साखरवाडी येथेही 100 टक्के बंद यशस्वी झाला. डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: