Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बंदला पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये हिंसक वळण
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:48 AM (IST)
Tags: mn2
ठिकठिकाणी रास्ता रोको, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गही ठप्प
5मुंबई/पुणे, दि. 9(प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराचे गालबोट लागले. पुणे, औरंगाबाद, नाशिक, नांदेड आदी ठिकाणी झालेल्या दगडफेकीत व जाळपोळीच्या घटनांमध्ये अनेक एस.टी. बसेस व खाजगी वाहनांचे नुकसान झाले. आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्वच महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई, ठाणे व नवी मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले होते तरीही अनेक भागातील दुकाने व व्यवहार ठप्प होते. सायंकाळी आंदोलन संपल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली.
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी क्रांती दिनाचा मुहूर्त साधून सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आंदोलनाची धग आज संपूर्ण राज्यभर जाणवली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसक घटनांमुळे या शहरांना बंदमधून वगळण्यात आले होते; पण या तिन्ही शहरांसह राज्यातील सर्व जिल्ह्यात आज हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने जनजीवन ठप्प झाले होते. अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करताना याबाबतची आचारसंहिताही क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आली होती. दुपारपर्यंत काही तुरळक घटना वगळता शांततेत आंदोलन सुरू होते; परंतु दुपारनंतर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पुणे शहरात हिंसक जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. यात बंदोबस्तासाठी तैनात असणार्‍या पोलिसांच्या दिशेने काही आंदोलकांनी बाटल्या आणि चपला फेकल्या. काही आंदोलकांनी गेटवरून उड्या मारत कार्यालयात प्रवेश केला
आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांकडून गेटवर असणार्‍या काचांची आणि दिव्यांची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार तास हा गोंधळ सुरू होता. मात्र, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आवाहनानंतर परिस्थिती निवळली. चांदणी चौकात मुंबई-बंगलोर मार्गावर रास्ता रोको करणार्‍या जमावाने टायर जाळले, दगडफेक केल्याने पोलिसांना अश्रुधुराचा वापर करून सौम्य लाठीमारही करावा लागला. जमावाने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. आंदोलकांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गही तब्बल सात तास रोखून धरला होता. सकाळी साडेदहापासून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उर्से टोलनाक्यावर रोखण्यात आली होती. पुणे-नगर रस्त्यावर आंदोलकांनी रास्ता रोको केला. या मार्गावर असलेल्या ‘हयात’ या पंचतारांकित हॉटेलात घुसून तोडफोड केली. हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रमही बंद करण्यास भाग पाडले. पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कात्रज चौकात चक्का जाम करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारमधून पोलिसांची कारवाई आपल्या मोबाईलमध्ये कैद करणार्‍याला पाच-सहा पोलिसांनी बेदम मारहाण केली. व्हिडिओ काढणार्‍या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, पुण्यामध्ये आंदोलनाला जे हिंसक वळण लागले, त्यामध्ये मराठा समाजाचे लोक नव्हते. आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा काही जण प्रयत्न करत होते. त्यांनी तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले. अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केली.
औरंगाबादमध्ये जाळपोळ, कंटेनर पेटवला
औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीत आंदोलकांनी कंटेनर पेटवून तीन-चार कंपन्यांमध्ये तोडफोड केली. मात्र, वाळूज एमआयडीसीत तब्बल 60 कंपन्यांमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा दावा तेथील उद्योजकांनी केला आहे. अशी आंदोलने होणार असतील तर आम्ही येथे गुंतवणूक करायची की नाही, असा उद्विग्न सवालही या उद्योजकांनी केला आहे. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. नांदेडमध्येही बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. हिंगोलीतही आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. सेनगाव येथे शाळेच्या प्रांगणात असलेली मिनी स्कूल बस, एक खाजगी वाहन जाळण्यात आले तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारच्या काही घटना वगळता राज्यात बहुतांश भागात शांततेत आंदोलन केले गेले.
अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट बंद
मागच्या आठवड्यात आंदोलनात झालेल्या हिंसक घटनांच्या अनुभवामुळे पोलिसांनी यावेळी विशेष काळजी घेतली होती. जमावावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍यांची मदत घेण्यात आली. सोशल मीडियावरून पसरणार्‍या अफवांमुळे अनेकदा प्रश्‍न निर्माण होतात, म्हणून अनेक जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
एस.टी. सेवाही बंद
कुठल्याही आंदोलनात पाहिले लक्ष्य होतात त्या एस.टी. बसेस. मागच्या आंदोलनात बसेसचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांशी सर्व जिल्ह्यांमध्ये एस.टी. सेवा बंदच ठेवण्यात आली होती. सकाळी काही बसेस सोडण्यात आल्या; पण आंदोलकांनी त्यांना लक्ष्य केल्याने सायंकाळपर्यंत बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
मुंबई, ठाण्यात शांतता
मुंबई, ठाणे व नवी मुंबईला आजच्या बंदमधून वगळण्यात आले होते. लोकांना सतत वेठीस धरणे योग्य नसल्याने आज केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ठिय्या आंदोलन करण्यात आले; परंतु मागच्या अनुभवामुळे अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे, नवी मुंबईतील शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहारही आज बंद ठेवण्यात आले होते.
आमदाराचा विधानभवनासमोर ठिय्या
मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुंबईत आलेले शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांना आज प्रवेश नाकारण्यात आला. त्याचा निषेध म्हणून आबिटकर यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या दिला. विधानभवनाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले. शिवाजी महाराजांना अभिवादन करून आत्मक्लेश आंदोलनाला सुरवात करणार
असल्याचे त्यांनी सुरक्षारक्षकांना सांगितले तरीही त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे आ. आबिटकर व सहकार्‍यांनी
प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यापूर्वी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आ. आबिटकर यांनी या प्रकाराचा निषेध केला. ते म्हणाले, मी आमदार आहे. मला विधानभवनात प्रवेश नाकारण्याची गरजच नव्हती. मी अतिरेकी किंवा नक्षलवादी नाही. प्रवेश नाकारून माझ्या अधिकारांवर गदा आणली. शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणार होतो; पण प्रवेश नाकारल्याने आम्ही ठिय्या
आंदोलन केले.
शरद पवारांच्या घरासमोर ठिय्या
मराठा आंदोलकांनी बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळला. एवढेच नव्हे तर आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील घरासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात हातात भगवा झेंडा घेऊन अजित पवारदेखील सहभागी झाले होते.
महाराष्ट्र बंदमध्ये काही ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आंदोलनाने सरकारचा निषेध करण्यात आला. बारामतीतही मराठा आंदोलकांनी आज सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जमून घोषणाबाजी करत ठिय्या दिला. आंदोलन सुरू होताच खुद्द अजित पवारच घराबाहेर आले आणि त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला. त्यांनी आंदोलकांशी आरक्षणाविषयी संवाद साधला. आंदोलकासोबत घोषणा देत भगवा झेंडा हातात घेतला. आरक्षणाची मागणी करत या प्रकरणी सरकारच्या दिरंगाईचा
निषेधही केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: